शाहूवाडीतील मृत्युदर राज्यात सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:24 AM2021-05-24T04:24:17+5:302021-05-24T04:24:17+5:30
आंबा : कोविड संसर्गाने शाहूवाडी तालुक्यात त्रेपन्न रुग्ण दगावलेत. ४.१६ हा मृत्युदर राज्यात सर्वाधिक आहे, ही भूषणावह बाब नव्हे. ...
आंबा : कोविड संसर्गाने शाहूवाडी तालुक्यात त्रेपन्न रुग्ण दगावलेत. ४.१६ हा मृत्युदर राज्यात सर्वाधिक आहे, ही भूषणावह बाब नव्हे. गाव पातळीवरील ग्राम दक्षता समित्यांनी आता तरी जागे व्हावे. कोविडच्या महामारीत नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून शंभर टक्के लसीकरण, बाहेरून आलेल्यांना संस्थात्मक अलगीकरण, स्वॅब तपासणी, पॉझिटिव्ह रुग्णांना तातडीचे उपचार व त्यांच्या संपर्कातील तीस जणांचे ट्रेसिंग व गृहभेटीतून संशयित रुग्ण या शोधमोहिमेत जबाबदारीने काम करावे, अन्यथा दक्षता समित्या बरखास्त करण्याचे कडक निर्देश तहसीलदार गुरू बिराजदार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिले.
मुंबई, पूण्याहून दररोज १७ ते १८ ट्रॅव्हल्स तालुक्यात येतात. शहरातून येणाऱ्यांची संख्या कायम आहे; पण त्यांचे अलगीकरण व स्वॅब तपासणीस दक्षता समिती डोळेझाक करते. शाळा, समाजमंदिरे, अंगणवाडी सुविधा असताना १२६ बाधित रुग्णांपैकी शंभर रुग्ण घरात व फक्त सव्वीस रुग्ण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. चाळीस गावांतून भेटी दिल्या; पण सर्वत्र ढिलाई असल्याची खंत बिराजदार यांनी व्यक्त केली. मुंबईतील संसर्ग कमी होत असताना ग्रामीण भागात मात्र बाधितांची संख्या वाढताना दिसते, शिवाय मृत्यूची आकडेवारी कमी नाही. तेव्हा चाकरमान्यांच्या स्थलांतरावर निर्बंध घालावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. ५३ रुग्णांच्या मृत्यूची चौकशी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डेथ ऑडिट सादर करण्याचे यावेळी आदेश दिले.
चौकटीसाठी-
पावसाळा तोंडावर आला आहे. वारणा, कडवी व कासारी या मुख्य नद्यांना येणारा पूर पाहता पूररेषा, संभाव्य स्थलांतर व्यवस्था, निवारागृहे सज्ज ठेवावीत. पोहणाऱ्या व्यक्ती, वाहन सुविधा स्थानिक ठिकाणी सज्ज कराव्यात, असे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी स्पष्ट केले. आभार सहायक गटविकास अधिकारी कोटकर यांनी मानले. या कान्फरन्समध्ये तालुक्यातील पदाधिकारी, सरपंच, ग्राम समिती सदस्य, वैद्यकीय अधिकारी, नोडलधिकारी, पोलीस पाटील, आशा, शिक्षक सहभागी होते.