मिरजेत सर्वाधिक जातवैधता बनावट प्रमाणपत्रांचे वाटप
By admin | Published: January 6, 2015 12:39 AM2015-01-06T00:39:26+5:302015-01-06T00:51:02+5:30
हारगेचा कारनामा : वारेंचा जबाब पूर्ण; सहीचे नमुने पडताळणीसाठी पुण्याला पाठविणार
कोल्हापूर : जातवैधता बनावट प्रमाणपत्र प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अटक केलेला संशयित बाळासाहेब ऊर्फ प्रशांत महादेव हारगे (वय ३२, रा. सलगरे, ता. मिरज, जि. सांगली) याने आपल्या साथीदारांकरवी सर्वाधिक जास्त बनावट प्रमाणपत्रे मिरज येथे वाटप केली असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे. आज, सोमवारी विभागीय जात पडताळणी समिती कार्यालय क्रमांक दोनचे उपायुक्त तथा सदस्य सुनील वारे यांचा जबाब पोलिसांनी घेतला. या प्रमाणपत्रावरील सही व अधिकाऱ्यांच्या सहीचे नमुने पुणे येथील हस्ताक्षरतज्ज्ञांकडे पूर्ण तपासाअंती पाठविण्यात येणार आहेत.
महिन्यापूर्वी कोल्हापुरात हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयित हारगेचा साथीदार व मुख्य सूत्रधार समीर बाबासो जमादार (रा. मल्लेवाडी, ता. मिरज) व विचारेमाळ येथील विभागीय जात पडताळणी समिती कार्यालयातील लिपिक संशयित अनिल हरिहर ढवळे या दोघांना अटक केली. सध्या हे तिघेजण जामिनावर बाहेर आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, गतवर्षी ५ डिसेंबर २०१४ रोजी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात संशयित बाळासाहेब हारगेला पोलीस व या कार्यालयाचे अधिकारी यांनी बनावट प्रमाणपत्रेप्रकरणी रंगेहात पकडले होते. हारगेने सातारा जिल्ह्यातील कृष्णात आनंदा संकपाळ (वय ३२, रा. सुरुल, ता. पाटण) यांना ‘कुणबी’ जातीचे वैधता प्रमाणपत्र देतो असे सांगून त्यांची ४० हजार रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर हारगेचा साथीदार जमादारच्या घरातून पोलिसांनी प्रमाणपत्र देण्यासाठी वापरण्यात येत असलेला कागद, प्रिंटर, स्कॅनर व इतर साहित्य जप्त केले होते. हारगेने ज्यांना अशा प्रकारची बनावट प्रमाणपत्रे दिली आहेत, त्या नावाची यादी केली. त्यानुसार त्यांच्याशी संपर्क साधून त्याच्याकडील २० बनावट प्रमाणपत्रे जप्त केली. यांपैकी हारगेने १५ प्रमाणपत्रे ही मिरजेत, तर सातारा जिल्ह्यात पाच दिली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
दरम्यान, ढवळेने वरिष्ठांचा सहभाग असल्याचे चौकशीत सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी समितीच्या सदस्या सचिव वृषाली शिंदे यांची चौकशी केली. त्यानंतर आज, सोमवार दुपारी सुनील वारे यांचा जबाब घेण्यात आला. येथून पुढे जातवैधता प्रमाणपत्र देणारी यंत्रणा मजबूत करू व असा प्रकार होणार नाही याची दक्षता घेऊ, असे त्यांनी जबाबात म्हणणे दिले. तपास सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव करीत आहेत.
सांगली जिल्ह्यातही बनावट प्रमाणपत्रे
संशयित हारगेने कोल्हापूर जिल्ह्यात एकही प्रमाणपत्र दिले नसल्याचे तर सातारा, सांगली जिल्ह्यांत अशा प्रकारची जातवैधता बनावट प्रमाणपत्रे दिल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. या प्रकरणाचे आणखी धागेदोरे सापडतील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
या दोन अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर आता कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब घेणार आहे. जात वैधता बनावट प्रमाणपत्र प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे. तपासासाठी अजून १५ दिवसांचा कालावधी लागेल.
- विद्या जाधव, साहाय्यक पोलीस निरीक्षक,
शाहूपुरी पोलीस ठाणे, कोल्हापूर.