सर्वाधिक निरक्षर नंदूरबार जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात अजूनही ४० हजार निरक्षर; साक्षरतेचे आव्हान मोठे
By समीर देशपांडे | Published: June 26, 2023 05:16 PM2023-06-26T17:16:25+5:302023-06-26T17:17:05+5:30
३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यातील सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट
समीर देशपांडे
कोल्हापूर : एक रुपयाही मानधन न देता राज्यातील सव्वा लाख निरक्षरांना साक्षर करण्याचे आव्हान महाराष्ट्रासमोर आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदूरबार जिल्ह्यात असून मुंबई राजधानी शेजारच्या ठाणे जिल्ह्यात अजूनही ४० हजार ७९६ निरक्षर आहेत. निरक्षरतेबाबत गडचिरोली, वाशिम आणि नाशिक अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या क्रमांकावर आहेत.
केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ राबवण्याची सूचना सर्व राज्यांना केली असून त्यानुसार महाराष्ट्रातही कामकाज सुरू झाले आहे. परंतु सध्या केवळ सर्वेक्षणाच्या पातळीवरच तयारी सुरू आहे. ३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यातील सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे.
१५ ते ३५ या वयोगटातील निरक्षरांना प्राधान्याने साक्षर करण्यात येणार असून त्यानंतर ३५ वर्षांहून अधिक वयोगटातील निरक्षरांचा विचार करण्यात येणार आहे. परंतु महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता ३५ वयापर्यंतच्या निरक्षरांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे प्रौढांच्या साक्षरतेवरच भर देण्यात येणार आहे.
स्वयंसेवकांवर भर
ही संपूर्ण योजना स्वयंसेवकांवर आधारित आहे. राष्ट्रीय सेवा योजना, छात्रसेना, नेहरू युवा केंद्राचे कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्या, निवृत्त शिक्षक यांनी ही सेवा द्यावी, अशी अपेक्षा असून यातील कोणालाही मानधन देण्यात येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील जिल्हावार निरक्षर
२०११ च्या जनणनेनुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यातील निरक्षरांची संख्या अहमदनगर २०,७०२, अकोला ६,२५०, अमरावती ९,४१८, छत्रपती संभाजीनगर १७,८३७, भंडारा ४,४२७, बीड १४,५८२, बुलढाणा ११,३२७, चंद्रपूर ९,३७४, धुळे ११,१५४, गडचिरोली ३७,२००, गोंदिया ४,८१७, हिंगोली ६,२५०, जळगाव १९,७९०, जालना ११,२८४, कोल्हापूर १५,४५०, लातूर ११,७६१, मुंबई शहर ८,२८९, मुंबई उपनगर २६,०४०, नागपूर १४,३२२, नांदेड १७,४४७, नंदूरबार ६८,८२०, नाशिक २८,२५३, परभणी १०,०२५, पुणे३३,३७५, रायगड १०,३७३, रत्नागिरी ६,३३६, सांगली ११,४५८, सातारा ११,४१४, सिंधुदुर्ग २,६९१, सोलापूर २१,३०९, ठाणे ४०,७९६, वर्धा ५,१२३, वाशिम ३१,६२०, यवतमाळ १२,३२६ आहेत.
निरक्षरतेची कारणे
- कुटुंबातील गरिबी
- रोजगारासाठी स्थलांतर
- पालकांचे छत्र लवकर हरपल्याने दुर्लक्ष
- शैक्षणिक वातावरणाचा अभाव
- शाळा जवळ नसल्याचा परिणाम