तळसंदेत आढळला सर्वांत जास्त स्थलांतर करणारा अमूर फाल्कन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:24 AM2020-12-06T04:24:48+5:302020-12-06T04:24:48+5:30
नवे पारगाव : दरवर्षी तब्बल २२ हजार किलोमीटर प्रवास करणाऱ्या शिकारी पक्षी वर्गातील ‘अमूर फाल्कन’ या पक्ष्याने तळसंदे येथील ...
नवे पारगाव : दरवर्षी तब्बल २२ हजार किलोमीटर प्रवास करणाऱ्या शिकारी पक्षी वर्गातील ‘अमूर फाल्कन’ या पक्ष्याने तळसंदे येथील विष्णू तलावावर वास्तव्य करून पक्षिमित्रांना सुखद धक्का दिला आहे.
प्रथम हा पक्षी कॉमन केस्ट्रेल (सामान्य खरुची) असलेचे वाटले; परंतु पंख व पोटाखालील रंग, तसेच चोचीच्या मागील मांसल आवरणाचा रंग यावरून हा नक्कीच वेगळा द शिकारी पक्षी असल्याचे जाणवले. मुंबई येथील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी ‘अमूर फाल्कन’ पक्ष्याची मादी असल्याचे सांगितले.
मराठीत याला ‘अमूर ससाणा’ असे नाव आहे. शास्त्रीय भाषेत ‘फाल्को अमुरेनसिस’ नाव आहे. याचे मूळ निवास चीनच्या पूर्व भागात असलेल्या अमूर नदीच्या खोऱ्यात आहे. हिवाळ्यात ते दक्षिण अफ्रिकेत जातात. शिकारी पक्ष्यांमध्ये सर्वांत लांब स्थलांतर करणारा हा पक्षी आहे.
थंडी सुरू झाली की, अन्य पक्ष्यांप्रमाणे अमूरची स्थलांतर करतात. चीन मार्गे ते भारताच्या उत्तर-पूर्व राज्यामध्ये, नागालँड येथे येतात. तेथून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बंगालचा उपसागर, मध्य भारत, अरबी समुद्र मार्गे करून थेट दक्षिण आफ्रिकेत पोहोचतात. तिथे ते संपूर्ण उन्हाळा म्हणजे उत्तर गोलार्धातील हिवाळा संपेपर्यंत मार्चपर्यंत विसावतात. एप्रिलमध्ये पुन्हा एकदा ते त्यांच्या मूळ जागी परतण्यासाठी निघतात. एप्रिल ते मे हा विणीचा हंगाम असतो. चार ते सहा अंडी घालतो. नर व मादी दोघेही अंडी उबविण्याचे काम करतात.
अमूर पक्ष्याच्या स्थलांतराच्या मार्गाच्या दृष्टीने संशोधनास विष्णू जलाशयावरील ही नोंद महत्त्वपूर्ण ठरेल. नवनवीन स्थलांतरित पक्ष्यांच्या नोंदी होत असल्याने विष्णू जलाशयाच्या पक्षिवैभवात भरच पडत आहे.
- युवराज पाटील
अध्यक्ष, वाईल्ड लाईफ कॉन्सर्व्हेशन अँण्ड रिसर्च फौंडेशन व महाराष्ट्र पक्षिमित्र.
फोटो ओळी : विष्णू जलाशयाच्या काठावर तारेवर बसलेला ‘अमूर फाल्कन पक्षी’ (छाया : युवराज पाटील)