वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष अन् बेफिकिरीच नडते..!, सदोष रस्तेही अपघातांचे मुख्य कारण
By उद्धव गोडसे | Published: May 11, 2024 12:12 PM2024-05-11T12:12:02+5:302024-05-11T12:13:01+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट..जाणून घ्या
उध्दव गोडसे
कोल्हापूर : वाहनधारकांच्या चुकांमुळेच बहुतांश अपघात होतात. सुरक्षा साधनांचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन केल्यास सुमारे ८० टक्के अपघात टाळता येतात. यासाठी वाहनधारकांनी स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. अपघातात गेलेला जीव आणि झालेले नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे पश्चात्ताप होऊ नये, यासाठी वेळीच खबरदारी घेणे हिताचे ठरते.
अपघात झाल्यानंतर अनेकदा रस्त्यांना दोष दिला जातो. रस्त्यात खड्डे आहेत, धोकादायक वळणे आहेत, सूचनाफलक नाहीत, संरक्षक कठडे नाहीत अशी कारणे सांगून वाहनचालकांच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, बहुतांश अपघात हे वाहनचालकांच्या चुकांमुळेच होतात ही वस्तुस्थिती आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे ज्ञान नसते. वळण घेताना इंडिकेटरचा वापर करत नाहीत. भरधाव वाहने चालवतात. ओव्हरटेक करतात. गर्दीतही यू- टर्न घेणारे महाभागही कमी नाहीत. दुचाकींना आरसे नसतात. मोजकेच दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतात.
महामार्गावरील प्रवास तर रामभरोसे असतो. महामार्गाच्या लगतच बाजार भरतात. विक्रेत्यांचे अतिक्रमण असते. वाहनांचे धोकादायक पार्किंग असते. कागल ते सातारा यादरम्यान महामार्गावर या समस्या गंभीर आहेत. सामूहिक प्रयत्नाने यात सुधारणा करणे शक्य आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक प्रशासन यांचे प्रयत्न आणि वाहनचालकांनी स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन केल्यास बहुतांश अपघात टाळून प्रवास सुरक्षित होऊ शकतो.
बायपास, उड्डाणपूल असावेत
राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गांचे रुंदीकरण होत आहे. वाढती वाहतूक लक्षात घेऊन हे मार्ग गावाबाहेरून काढणे गरजेचे आहे. त्यासाठी बायपास किंवा उड्डाणपुलांचा पर्याय अवलंबावा लागेल. तरच अपघातांचा धोका कमी होऊन प्रवास गतिमान आणि सुरक्षित होईल.
अशी घ्यावी दक्षता
- परवाना सोबत असावा
- वाहनाचा विमा आवश्यक
- दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे
- चारचाकीमध्ये सीटबेल्टचा वापर करावा
- गतीच्या सूचनांचे पालन करावे
- महामार्गावर लेन क्रॉसिंगवेळी इंडिकेटरचा वापर करावा
- रस्त्याकडेला वाहन थांबवू नये
- पार्किंग लाइटचा वापर करावा
- वेळोवेळी वाहनांची देखभाल दुरुस्ती करावी
या सुधारणा आवश्यक
- वाहतूक नियमांचे पालन व्हावे
- ब्लॅक स्पॉटवर सुधारणा व्हाव्यात
- रस्त्याच्या कडेला सूचनाफलक लावावेत
- सर्व्हिस रोड अत्यावश्यक
- महामार्गांवर दुचाकींना प्रवेशबंदी करावी
- उलट्या दिशेने होणारी वाहतूक पूर्ण बंद व्हावी
- ऊस वाहतुकीची वाहने रस्त्याकडेला थांबवू नयेत
- वाहनांना रिफ्लेक्टर असावेत
जीव महत्त्वाचा की घाई?
बहुतांश अपघात वाहनचालकांच्या घाईगडबडीतून होतात. वेळेत पोहोचण्यासाठी घाईत वाहने चालवून अपघातांना निमंत्रण दिले जाते. पाच-दहा मिनिटे उशिराने पोहोचल्यास काम होण्यास थोडा उशीर होईल. मात्र, अपघातात होणारे नुकसान भरून येत नाही. घाई टाळण्यासाठी पाच-दहा मिनिटे आधीच घराबाहेर पडावे. विशेषतः तरुणांनी याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट
- कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर केरली फाटा, शिवाजी पूल ते वडणगे फाटा, आंबेवाडी ते रेडेडोह.
- पुणे-बंगळुरू महामार्गावरील कणेरीवाडी फाटा, लक्ष्मी टेकडी, गोकुळ शिरगाव, किणी टोलनाका, वाठार उड्डाणपूल, अंबप फाटा, टोप, नागाव.
- सांगली मार्गावरील हालोंडी ते अतिग्रे फाटा, कबनूर फाटा, गारगोटी मार्गावरील कळंबा ते कत्यायनी वळण.
- तसेच मुरगूड नाका हे जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट आहेत.