इचलकरंजीत बहुतांशी यंत्रमाग बंद : कापड उद्योगास अच्छे दिनची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:11 PM2017-11-06T23:11:18+5:302017-11-06T23:15:18+5:30
इचलकरंजी : दीपावली सणानंतर दोन आठवडे उलटले तरी शहर व परिसरातील ४० टक्के यंत्रमागांची एकच पाळी सुरू झाली आहे
इचलकरंजी : दीपावली सणानंतर दोन आठवडे उलटले तरी शहर व परिसरातील ४० टक्के यंत्रमागांची एकच पाळी सुरू झाली आहे. अद्यापही कापडाला मागणी नसल्यामुळे आणखीन आठवडाभर तरी यंत्रमाग कारखाने सुरू होण्याची शक्यता नसल्याची चर्चा यंत्रमागधारकांतून व्यक्त होत आहे. दीपावलीनंतर यंत्रमाग कापडाला अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा असली तरी ती मात्र अद्याप दूरच राहिली आहे.
यंत्रमाग कापड उद्योग गेल्या अडीच वर्षांपासून आर्थिक मंदीच्या फेºयात अडकला आहे. स्वत:चे कापड उत्पादन करणारे यंत्रमागधारक व कापड व्यापारी यांना फारसा नफा मिळत नसला तरी बहुतांशी कालावधी नुकसानीत गेल्यामुळे यंत्रमागधारक हवालदिल झाले आहेत. अशा स्थितीमध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्टÑात असलेले जास्त विजेचे दर आणि महागाई यामुळे रोजगाराभिमुख असलेल्या या उद्योगास शासनाने मदत करावी, यासाठी यंत्रमाग केंद्रांमधून विविध प्रकारची आंदोलने झाली.
डिसेंबर २०१५ मध्ये हिवाळी अधिवेशनात वीजमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंत्रमागाच्या वीज दरात सवलत देण्यात येईल, असे आश्वासन दिले आणि त्यानंतर वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी आॅगस्ट २०१६ मध्ये इचलकरंजीत घेतलेल्या यंत्रमाग परिषदेमध्ये, जुलै २०१६ पासून यंत्रमाग उद्योगाला आणखीन प्रतियुनिट एक रुपये वीज दराची सवलत व यंत्रमाग उद्योगासाठी घेतलेल्या अर्थसहायासाठी पाच टक्के व्याजाची सवलत देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. वीजमंत्र्यांच्या आश्वासनाला दोन वर्षे होत आहेत. तर वस्त्रोद्योगमंत्र्यांच्या ग्वाहीला सव्वा वर्ष उलटले, तरी अद्याप त्यांनी दिलेल्या आश्वासनांची यंत्रमागधारकांना मार्गप्रतीक्षा आहे.
कापडाला गिºहाईक नसल्यामुळे यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये आणि कापड उत्पादन करणाºया कारखानदारांच्या नफ्यामध्ये वाढ होत नाही, अशा स्थितीत हा उद्योग गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळ रखडला आहे. दिवाळीनंतर कापडाला गिºहाईक वाढेल आणि पुन्हा यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था येऊन कापड विक्रीसाठी तेजी येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दिवाळीनंतर दोन आठवडे झाले तरी अद्यापही त्याबाबत कोणताही मागमूस नाही. त्याचा परिणाम म्हणून इचलकरंजी व परिसरातील सुमारे ४० टक्के यंत्रमाग कारखान्यांमध्ये फक्त दिवस पाळी म्हणजे जेमतेम २० ते २५ टक्के कापड उत्पादन सुरू झाले आहे. उर्वरित यंत्रमाग कारखाने आणखीन आठवडाभर तरी चालू होतील की नाही, याची शंका असल्याची येथील वस्त्रोद्योगात चर्चा आहे.