वेदगंगाकाठ बचावासाठी पदाधिकाऱ्यांची 'मोट'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:27 AM2021-08-14T04:27:29+5:302021-08-14T04:27:29+5:30
म्हाकवे : महापुरात दरवर्षीच वेदगंगा नदीकाठावरील गावांचे जनजीवन विस्कळीत होते. शेकडो कुंटुंबांना स्थलांतरित व्हावे लागते. हजारो एकरातील पिकांची माती ...
म्हाकवे : महापुरात दरवर्षीच वेदगंगा नदीकाठावरील गावांचे जनजीवन विस्कळीत होते. शेकडो कुंटुंबांना स्थलांतरित व्हावे लागते. हजारो एकरातील पिकांची माती होते. परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसतो. वर्षानुवर्षे पुराची व्याप्ती वाढण्यास राष्ट्रीय महामार्गासह बस्तवडे, बानगे पुलांचा भराव बंधाऱ्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष अशा अनेक प्रशासनाच्या चुकाही कारणीभूत आहेत. त्यामुळे याबाबत येत्या सहा महिन्यांत योग्य त्या उपाययोजना न केल्यास वेदगंगा नदीकावरील सर्व शेतकरी, नागरिक यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरू, असा निर्वाणीचा इशारा २२ गावांतील सरपंच, उपसरपंच व प्रमुख मंडळींनी दिला.
कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागात वळविण्याला प्राधान्य द्या, पीक नुकसान भरपाईच्या रक्कम वाढवा, अशीही मागणी अनेकांनी केली.
भडगाव (ता. कागल) येथे वेदगंगा नदीकाठावरील २२ गावांतील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, प्रमुखांसह शेतकऱ्यांची बैठक झाली.
यावेळी दिलीप चौगले (भडगाव), दिगंबर अस्वले (मळगे बुद्रक), दत्ता सावंत (बानगे), बी. एम. पाटील, दिलीप पाटील (यमगे), अमित पाटील (निढोरी), उमेश पाटील (आणूर), गिरीश पाटील (कुरुकली) यांनी मनोगत व्यक्त केले. महादेव चौगुले (म्हाकवे), अनिल कांबळे, बाळासाहेब मोरे (सुरुपली), दीपक कमळकर, आनंदा तोडकर (आणूर), शिवाजी पाटील (बानगे), जयवंत पाटील (बस्तवडे) आदी उपस्थित होते. अजित मोरबाळे यांनी आभार मानले.
मुरगूडचे सांडपाणी रोखा...
बानगे, बस्तवडे, यमगर्णी या तीन पुलांवरील भरावा काढून हँगिंग पूल करावेत, मुरगुडचे वेदगंगेत मिसळणारे सांडपाणी बंद होण्यासाठी तेथे प्रक्रिया केंद्र करावे, पीक नुकसानभरपाईची रक्कम वाढवावी, अशी मागणी दिगंबर अस्वले-मळगेकर यांनी केली.
...तर पुढची पिढी भूमिहीन होईल
पूर्वी नदीकाठची जमीन शाश्वत पिकणारी मानली जात. परंतु अलीकडे पुरामुळे पेरणीचा खर्चही वाया जात आहे. ही जमीन वाचविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवूया, असा निर्धारही या बैठकीतील सरपंच दिलीप पाटील (यमगे) यांनी व्यक्त केला.
०१३ भडगाव
भडगाव येथे पुराला कारणीभूत असणाऱ्या अडथळ्यांबाबत चर्चा करताना वेदगंगा नदीकाठावरील सरपंच व प्रमुख मंडळी.
(छाया-दत्ता पाटील, म्हाकवे)