डोेळे आभाळाकडे, शिवारात मशागतीची धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:27 AM2019-06-05T10:27:22+5:302019-06-05T10:29:27+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत आहे, आभाळ भरून येत आहे, पण पाऊस काही पडत नाही. मात्र या वातावरणाने चातकाप्रमाणे पावसाच्या थेंबासाठी दोन महिन्यांपासून आसुसलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
कोल्हापूर: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत आहे, आभाळ भरून येत आहे, पण पाऊस काही पडत नाही. मात्र या वातावरणाने चातकाप्रमाणे पावसाच्या थेंबासाठी दोन महिन्यांपासून आसुसलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
चार-पाच दिवस मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने तर शेतकरी सुखावून गेला आहे. डोळे आभाळाकडे लागले असले तरी दोन दिवसांवर आलेल्या मृग नक्षत्रावर पेरा साधण्यासाठी शिवारात मशागतीच्या कामांची अक्षरश: धांदल उडाली आहे. आख्खे कुटुंब शेतकामात रमल्याचे चित्र जागोजागी दृष्टीस पडत आहे. दरम्यान, मान्सून केरळच्या उंबरठ्यावर दाखल होत असल्याच्या आलेल्या वार्तेने तर आनंदात भर पडली असून, शेती कामे करताना हुरूप आला आहे.
जिल्ह्यात एप्रिल, मे या महिन्यांत वळीव पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो. हे वर्ष मात्र त्याला अपवाद ठरले आहे. मार्चमध्ये एखाद्दुसरा वळीव वगळता पाऊसच झालेला नसल्यामुळे मशागतीच्या कामांनाही मर्यादा आल्या. तरीही शेतकऱ्यांनी यंत्राच्या साहाय्याने मशागतीकडे करण्यास प्राधान्य दिले. रोहिणी नक्षत्रावर पेरा साधणेही अवघड होऊन बसले.
निदान मृगाचा तरी पेरा साधता यावा म्हणून शेतकरी मोठ्या कष्टाने जमीन पेरणीयोग्य करण्याच्या कामात गुंतला आहे. येत्या शनिवारी (दि. ८) सायंकाळी सहा वाजून १२ मिनिटांनी मृग नक्षत्र सुरू होणार आहे. या नक्षत्रावर भात, सोयाबीनच्या पेरा साधावाच लागतो. तो साधला गेला नाही तर मात्र हंगाम पुढे जाऊन उत्पादनासह पुढील पिकांच्या लागवडीवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळेच हा पेरा काहीही करून साधायचाच असा चंग बांधून शेतकरी आपल्या कुटुंबकबिल्यासह शिवारात राबताना दिसत आहे. त्याच्या या कष्टाला ढगाळ वातावरणाची साथ मिळत आहे.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहत आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हापासून काहीशी सुटका झाली असून मशागतीची कामेही वेगाने होत आहेत. आभाळ भरून येत आहे. मात्र दुपारनंतर पुन्हा ऊन पडत असल्याने आशेवर पाणी फिरत आहे.