आई अंबाबाई, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढ, देवीला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 06:32 PM2019-11-07T18:32:02+5:302019-11-07T18:34:05+5:30
‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा व ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी गुरुवारी सकाळी करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. देवीचा प्रसाद देऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष महेश जाधव यांनी दर्डा बंधूंचा हृद्य सत्कार केला.
कोल्हापूर : ‘आई अंबाबाई, परतीच्या पावसाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढ; राज्याला लवकरच नवे कल्याणकारी सरकार मिळू दे,’ अशी प्रार्थना ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा व ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी गुरुवारी सकाळी करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेत केली. देवीचा प्रसाद देऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष महेश जाधव यांनी दर्डा बंधूंचा हृद्य सत्कार केला.
‘लोकमत’ भेटीसाठी आलेल्या विजय दर्डा व राजेंद्र दर्डा यांनी गुरुवारी सकाळी करवीरनिवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. मंदिराच्या परिसरातील इतर देवीदेवतांच्या मंदिरांची त्यांनी पाहणी केली. देवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव यांनी त्यांना समितीच्या कार्याबद्दलची माहिती दिली. देशातील तीन शक्तिपीठांपैकी एक पीठ इतके मोठे या देवीचे माहात्म्य आहे.
मंदिराला खूप प्राचीन इतिहास आहे; परंतु तरीही या देवीचे माहात्म्य देश-परदेशांत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो आहोत. शिर्डी देवस्थानच्या तुलनेत अंबाबाईचे उत्पन्न कमी आहे. आता गेल्या तीन वर्षांत आम्ही सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न वाढविले असून, आता ते २२ कोटी रुपयांपर्यंत जाईल, असे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले. देवस्थानच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम चालविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, प्रेसिडेंट (अॅड, सेल्स) करुण गेरा, उपाध्यक्ष (वितरण) वसंत आवारे, साहाय्यक उपाध्यक्ष (एचआर) बालाजी मुळे, साउथ महाराष्ट्र हेड (जाहिरात) अलोक श्रीवास्तव, ‘लोकमत’ कोल्हापूरचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
देवीची दूरदर्शन मालिका करणार
जय मल्हार, बाळूमामासारख्या दूरदर्शन मालिकांप्रमाणेच अंबाबाई व जोतिबाचे माहात्म्य भाविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्याही मालिका करण्याचा मनोदय अध्यक्ष जाधव यांनी व्यक्त केला.
‘लोकमत’चे कौतुक
अंबाबाईच्या दर्शनरांगेत असलेल्या एका भाविक महिलेने विजय दर्डा यांना ओळखले व मध्येच अडवून त्यांना नमस्कार केला. कोल्हापुरात ‘लोकमत’चा अंक चांगला निघत असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.