जमिनीसाठी मुलानेच केला आईचा खून संशयितास अटक : गारगोटीतील ‘त्या’ खुनाचा छडा;
By admin | Published: May 10, 2014 12:11 AM2014-05-10T00:11:27+5:302014-05-10T00:11:27+5:30
गारगोटी : जमीन नावावर न केल्याच्या रागातून लीलाबाई महादेव जवाहिरे (वय ७०) हिचा खून करून, चोरीचा बनाव करून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात
गारगोटी : जमीन नावावर न केल्याच्या रागातून लीलाबाई महादेव जवाहिरे (वय ७०) हिचा खून करून, चोरीचा बनाव करून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार देणार्या पोटचा गोळा मिलिंद महादेव जवाहिरे (वय ३९, रा. बाजारपेठ, टेंबलाई चौक, गारगोटी) याला भुदरगड पोलिसांनी आठ दिवसांत अटक केली. आज (शुक्रवार) त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवार (दि. १२) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मंगळवार (दि. २९ एप्रिल) ते गुरुवार (दि. १) या दरम्यान साई कॉलनी येथे राहणार्या लीलाबाई यांचा अज्ञात चोरट्यांनी खून केल्याची तक्रार मुलगा मिलिंद याने भुदरगड पोलिसांत दिली. साई कॉलनीतील समोरचा दरवाजा उघडून, आत जाऊन तिजोरीतील दहा हजार रुपये व कर्णफुले असा पंचवीस हजारांचा ऐवज चोेरीस गेल्याचे त्याने भासवले. संशयित आरोपीने यासंदर्भात अज्ञाताविरोधी तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांना वेगळाच संशय आला होता. लीलाबाई या साई कॉलनी, इंजुबाई पाणंद रोडवर राहत असलेले घर, तेथील दुकान गाळे, मोकळी जागा, अशी अंदाजे दोन गुंठे जागा भाऊ सुनील यांच्या नावावर दीड वर्षांपूर्वी केल्याचे मिलिंद यास समजताच तो आईस वारंवार जाब विचारून भांडण काढू लागला. भरचौकात तिला ठार मारण्याची धमकी देऊ लागला. तसेच शिवार भैरी भागात असणारी बावीस गुंठे जमीन आई व चुलतभाऊ बाळासाहेब जवाहिरे यांच्या नावावर आहे. जमीन आपल्या नावावर कर असा तगादा तो आईकडे सतत करत होता. पण, आई त्याकडे दुर्लक्ष करीत होती. शिवाय साई कॉलनीतील राहते घर पोलीस असणारा भाऊ सुनील यांच्या नावावर केल्याचा राग त्याच्या मनात होता. अतिशय शांत डोक्याने नियोजनबद्धरीत्या मुलगा मिलिंद याने जन्मदात्या आईचा साडीने गळा आवळून खून केला व भाड्याने राहणार्या गवंड्यावर संशय व्यक्त केला. काहीही संबंध नसताना गवंड्यांना आठ ते दहा दिवस पोलीस तपासाला सामोरे जावे लागले. त्यांचे काही सहकारी गुजरात येथे गावी गेले होते. त्यांना बोलावून घेण्यात आले. चोरीचा बनाव आणि आईचा खून करून घरातील साहित्य विस्कटून टाकले आणि चोरी झाली, असा बनाव मिलिंदने केला. पण, पोलीस निरीक्षक बन्सी बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जेराव झुरळे, दादासोा कापसे, सुरेश मेटील, अमर पाटील, मधुकर शिंदे, यांनी सापळा रचून या आरोपीस शिताफीने अटक केली. अशोक भरते हे गेले दोन दिवस गारगोटीत तळ ठोकून होते.