Kolhapur: लिव्ह-इनमध्ये राहण्याचा आग्रह; आई, भावाच्या मारहाणीत तरुणीचा मृत्यू; तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 11:52 AM2024-04-05T11:52:28+5:302024-04-05T11:52:45+5:30
कृत्याचा पश्चाताप
कोल्हापूर : प्रेमीयुगुलाने आम्ही लग्न करणार नाही, लिव्ह इनमध्येच राहण्याचा आग्रह धरल्याच्या रागातून तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय २४, रा. शनिवार पेठ, कोल्हापूर) हिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ३) रात्री ते गुरुवारी (दि. ४) पहाटेच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी मृत तरुणीची आई शुभांगी (वय ५०), भाऊ सूरज (वय २०) आणि मामा संतोष बबन आडसुळे (वय ३५, सध्या रा. देवठाणे, ता. पन्हाळा, मूळ रा. इचलकरंजी) या तिघांना अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, खासगी बँकेत नोकरी करणारी वैष्णवी पोवार ही आई आणि लहान भाऊ यांच्यासोबत शनिवार पेठेतील घरात राहत होती. नऊ वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. तिचे ओळखीतील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबीयांचाही याला पाठिंबा होता.
मात्र, लग्न न करता दोघे एकत्र राहण्याचा विचार करीत होते. लग्न तरी करा किंवा प्रेमसंबंध तोडा, असा आग्रह वैष्णवी हिच्या आईने धरला होता. त्याबद्दल समजूत काढण्यासाठी शुभांगी पोवार या बुधवारी मुलगी वैष्णवी, मुलगा सूरज आणि भाऊ संतोष यांना सोबत घेऊन एसटीने पुण्याला कात्रज येथे गेल्या. तिथे वैष्णवी आणि तिच्या प्रियकराला लग्न करण्याचा सल्ला दिला.
मात्र, दोघेही लग्न न करता एकत्र राहण्यावर ठाम होते. त्यामुळे चिडलेल्या शुभांगी मुलगा, मुलगी आणि भावाला घेऊन परत आल्या. ते चौघेही थेट देवठाणे (ता. पन्हाळा) येथे संतोष आडसुळे याच्या घरी गेले. तिथे तिघांनी काठी, दोरी आणि लोखंडी सळईने वैष्णवीला बेदम मारहाण केली. तासभर मारहाण सुरू होती. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास सर्वजण जेवण करून झोपले.
काही वेळाने वैष्णवीच्या पोटात दुखू लागले. पहाटेच्या सुमारास तिला खासगी रुग्णालयात घेऊन गेले, मात्र प्रकृती अधिकच बिघडत असल्याने कोल्हापुरातील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. लक्ष्मीपुरी येथील खासगी रुग्णालयात पोहोचल्यानंतर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने डॉक्टरांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी तातडीने तिन्ही संशयितांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
कृत्याचा पश्चाताप
वैष्णवीने तिचा निर्णय बदलावा, यासाठी नातेवाईकांनी मारहाण केली. तिला जिवे मारण्याचा उद्देश नव्हता. मात्र, मारहाणीत पाठीत, पोटात आणि छातीवर बेदम मार लागल्याने तिच्या शरीरात रक्तस्राव झाला. न कळत झालेल्या कृतीने मुलीचा जीव गेल्यामुळे नातेवाईकांना पश्चाताप झाला.
पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
मारहाणीत मुलीचा जीव गेला, तर आई, भाऊ आणि मामाला अटक झाली. या घटनेमुळे संपूर्ण पोवार कुटुंब उद्ध्वस्त झाले. घरात दुसरे कोणी नसल्याने पोलिसांच्या मदतीने बंदोबस्तात वैष्णवीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.