नवरा नांदवणार नाही या भीतीने जन्मदात्या आईने पोटच्या मुलीला पुरलं जिवंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 12:09 PM2017-08-31T12:09:45+5:302017-08-31T12:29:49+5:30
उपचारासाठी चिमुरडीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, गांधीनगर पोलिसांनी मुलीची आई सारिका लखन मोरे आणि तिची आई नकुशा सिद्राम भोसले या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूर, दि. 31 - मुलगी जन्माला आल्यानंतर जन्मदात्या आईनेच तिला जिवंत पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी तिने आपल्या आईची मदत घेतली होती. पतीने मुलगी जन्माला आली तर नांदवणार नाही अशी धमकीच दिली होती. त्यामुळे मुलगी जन्माला आल्यानंतर घाबरलेल्या या महिलेने आपल्या नवाजत मुलीला जिवंत पुरलं. कोल्हापुरातल्या गडमुडशिंगीत ही धक्कादायक घटना घडली आहे. माहिती मिळताच मुलीला बाहेर काढण्यात आलं. उपचारासाठी चिमुरडीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, गांधीनगर पोलिसांनी मुलीची आई सारिका लखन मोरे आणि तिची आई नकुशा सिद्राम भोसले या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सारिका हिचा विवाह लखन मोरेशी झाला होती. लखन मोरेचं हे दुसरं लग्न आहे. लखनला पहिल्या पत्नीपासून चार मुली आहेत. मुली झाल्याने नाराज झालेल्या लखन मोरेने पहिल्या पत्नीला माहेरी धाडून दिलं होतं. मुलगा हवा असल्याने त्याने सारिकाशी लग्न केलं. मात्र सारिकालाही पहिली मुलगी झाल्याने लखन मोरे प्रचंड चिडला होता. यामुळे दुस-यांदाही मुलगी झाली तर तुला नांदवणार नाही अशी धमकीच त्याने पत्नीला दिली होती.
आईच्या घरी बाळंतपणासाठी आलेली सारिका आणि तिची आई मुलगा जन्माला यावा यासाठी प्रार्थना करत होत्या. पण पुन्हा एकदा मुलगी जन्माला आल्याने त्या नाराज झाल्या. पतीने दिलेल्या धमकीमुळे आधीच घाबरलेल्या सारिकाने आपल्या आईच्या मदतीने मुलीला पोत्यात भरुन रेल्वे रुळाजवळ खड्डा खणून त्यात पुरलं. परिसरात राहणा-या लोकांना सारिका आणि तिच्या आईच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली.
काही लोकांनी पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी येऊन माय-लेकीची चौकशी केली. यावेळी दोघींनी नवजात मुलीला खड्डा खणून पुरलं असल्याची कबुली दिली. चिमुकलीला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी मुलीची आई सारिका लखन मोरे आणि तिची आई नकुशा सिद्राम भोसले या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे.