लेकरासाठी आई झिजली... अंत्ययात्रेला पालखी सजली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 05:26 AM2023-08-11T05:26:48+5:302023-08-11T05:27:01+5:30
उंदरवाडीतील पुत्रप्रेमाची गोष्ट : आईच्या कष्टामुळेच घडल्याची भावना
- दत्ता लोकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे (जि. कोल्हापूर) : भल्यामोठ्या पगारांच्या नोकऱ्या असताना जन्मदात्यांना वृद्धाश्रमात ठेवणारी पिढी आजूबाजूला असताना एका मुलाने मात्र आईच्या कष्टाचे मोल लक्षात घेऊन आयुष्यभर तिची सेवा केलीच; परंतु, मृत्यूनंतरही तिची फुला-पानांनी सजवलेल्या पालखीतून व टाळमृदंगाच्या गजरात अंत्ययात्रा काढून अनोखे पुत्रप्रेम जगाला दाखवले. सोडुनिया आई गेली आम्हा लेकरांना... आई आई आता म्हणावे कुणाला... अशी हाक दिल्यावर वातावरण गलबलून गेले.
कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती पाटील यांच्या आई भागीरथी शिवाजी पाटील (८२) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी निधन झाले.
खास बनवून घेतलेल्या लाकडी पालखीतून पार्थिव नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमारे सोळाशे लोकवस्तीचे हे गाव. आईने मोलमजुरी करून आपल्याला लहानाचे मोठे केले. ती राबली म्हणून माझ्या आयुष्यात चार सुखाचे दिवस आले ही
जाणीव ठेवून मुलग्याने आईची जिवंतपणीच सर्व हौस भागवली. गावच्या सरपंच अनिता पाटील यांच्या त्या सासू आहेत. त्यांच्या
पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
२० हजारांची पालखी
गेली तीन वर्षे आजारी असताना चांगली सेवा केली. आज ना उद्या आई जाणार हे माहीत असल्याने त्यांनी सरवडे येथील सुतार बंधूंना सांगून २० हजार रुपयांची लाकडी पालखी करून घेतली. तिच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण कराव्यात... आईही देवच आहे... त्यामुळे ती देवाघरी जाताना पालखीतूनच गेली पाहिजे, या भावनेने त्यांनी अंत्ययात्रा पालखीतून काढली. काही दिवसांपूर्वीच सर्व नातेवाइकांना बोलावून आईचे पाद्यपूजन करुन सर्वांना गोडधोड खाऊ घातले.