नवजात शिशंूसाठी येतेय ‘मदर मिल्क बँक’ : मुंबई, पुण्यानंतर कोल्हापुरात,रोटरी फौंडेशनतर्फे सीपीआर रुग्णालयाकडे प्रस्ताव सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:48 AM2017-12-23T00:48:54+5:302017-12-23T00:51:04+5:30
कोल्हापूर : नवजात बालकाला आईचे दूध हे तितकेच महत्त्वाचे; पण अनेक कुपोषित, अशक्त आईकडून या दुधाची कमतरता भासत असल्यामुळे जन्माला येणारे बालक आईच्या दुधाविना
तानाजी पोवार ।
कोल्हापूर : नवजात बालकाला आईचे दूध हे तितकेच महत्त्वाचे; पण अनेक कुपोषित, अशक्त आईकडून या दुधाची कमतरता भासत असल्यामुळे जन्माला येणारे बालक आईच्या दुधाविना अशक्तच बनते, दुर्दैवाने त्याला मृत्यूला सामोरे जावे लागते. हे मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आईचे दूध संकलन करून त्याची ब्लड बँकप्रमाणे साठवणूक करण्यासाठी कोल्हापुरात ‘मदर मिल्क बँक’ची योजना लवकरच साकारत आहे.
रोटरी फौंडेशच्यावतीने हा प्रस्ताव नुकताच शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे महाराष्टÑात मुंबई, पुण्यानंतर आता कोल्हापुरात ही संकल्पना साकारत आहे.समाजात अनेक कुपोषित मातांची नवजात बालकेही कुपोषित, अशक्तच जन्माला येतात. अशा अशक्त बालकांची फुप्फुसे कमकुवत होतात, जंतुसंसर्ग होऊन ते दगावण्याची शक्यता असते. त्यासाठी हे आईचे अंगावरील दूध जीवनदायी ठरते. अशा आईच्या दुधाचे संकलन करून ती ‘मदर मिल्क बँके’च्या माध्यमातून आवश्यक त्या मातां-शिशूपर्यंत पोहोचवण्याची नवी संकल्पना पुढे आली. ‘मदर मिल्क बँके’साठी यंत्रणा उभारण्याची तयारी रोटरी फौंडेशनच्यावतीने दर्शविली आहे तसा प्रस्ताव सीपीआर रुग्णालयाकडे पाठविला आहे.
फक्त २०० स्के.फूट जागा द्या
‘मदर मिल्क बँक’साठी सीपीआर रुग्णालय परिसरात फक्त २०० स्के. फूट जागा व चार कर्मचारी नेमण्याची मागणी केली. या बँकेसाठी लागणारी सर्व मशिनरी व खर्च रोटरी फौंडेशनने उचलण्याची तयारी दर्शविली आहे.
मुंबई, पुण्यानंतर कोल्हापुरातच
गेल्या चार वर्षांपासून ‘मदर मिल्क बँक’ मुंबईत कार्यरत आहे, तर गेल्या सहा महिन्यांपूर्वी पुण्यातही ही नव्याने बँक स्थापन करण्यात आली आहे. आता कोल्हापुरात ही बँक स्थापन झाल्यास पश्चिम महाराष्टÑात मातेच्या दुधाविना दगावणाºया नवजात बालकांचे प्रमाण थांबण्यास हातभार लागणार आहे. सध्या हे मृत्यूचे प्रमाण हजारात २३ इतके आहे.
बँकेसाठी ‘मदर मिल्क’ संकलन पद्धत
समाजात अनेक समाजसेविका अशा ‘मिल्क बँके’साठी स्वत:च्या अंगावरील दूध देण्यास तयार आहेत. सर्वसाधारण प्रसुतीनंतर एका बाळाला स्तनपान दिल्यानंतर इतर जादा दूध हे १०० ते २०० मिली दर आठवड्यातून संकलन करता येते; पण अशा महिला रुग्णालयात अथवा मिल्क बँकेत येऊन हे दूध देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा महिलांकडून फोन आल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन दूध संकलन करावे लागणार आहे. अशा मिल्क दान करणाºया महिलांना दूध काढण्यासाठी एक किट देण्यात येईल. दूध संकलन केल्यानंतर ते पुढील तीन तासांत मिल्क बँकेत आणून त्यातील प्रथिने मोजली जातात व त्यानंतर ते निर्जंतुक करून त्याचे पॅकिंग करून ठराविक तापमानात स्टोअर केले जाईल व ठराविक दिवसात गरजू नवजात शिशूला दिले जाते. ही पद्धत मुंबई, पुण्यामध्ये सध्या कार्यरत आहे.
चंद्रकांतदादांच्या सकारात्मक भूमिकेची आवश्यकता
रोटरी फौंडेशनच्यावतीने हा परिपूर्ण प्रस्ताव छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडे दिला आहे. त्यासाठी फक्त जागेची मागणी केली आहे. राज्यातील ‘दोन नंबर’चे वजनदार पद हे कोल्हापूरचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आहे. ते कोल्हापूरचे पालकमंत्रीही आहेत. त्यांनी या ‘मदर मिल्क बँक’साठी सकारात्मक भूमिका दाखविण्याची गरज आहे.
फायदे- नवजात बालकाला अशा मदर मिल्क बँकेतील दूध दिल्यास इतर बालकांपेक्षा त्याची वाढ जादा होते, अशा बालकांत डायबेटिस रोगाचे प्रमाण इतरांपेक्षा कमी असते. अशी नवजात बालके पुढे चपळ आणि बुद्धीने तल्लख बनतात, असा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.
कोल्हापुरात ब्लड बँकेप्रमाणेच अशा गरजू नवजात शिशूला आईचे दूध देण्यासाठी मदर मिल्क बँकेची गरज आहे. त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव नुकताच आम्ही रोटरी फौंडेशनच्यावतीने सीपीआर रुग्णालयाकडे पाठविला आहे, त्याच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहोत.
- प्रशांत मेहता, ३१७० डिस्ट्रीक सेक्रेटरी, रोटरी फौंडेशन.
रोटरी फौंडेशनच्यावतीने मदर मिल्क बँकसाठी प्रस्ताव आला आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यास शिशूचा मृत्यूदर कमी होईल. आईच्या दुधाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर या बँकेसाठी समाजातून इच्छाशक्ती जागृत झाली पाहिजे, हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
- शिशीर मिरगुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय