आईच्या काखेत बसून घातली आकाशाला गवसणी...
By admin | Published: June 18, 2014 01:00 AM2014-06-18T01:00:17+5:302014-06-18T01:04:03+5:30
प्रशमची दुर्धर आजारावर मात : दहावी परीक्षेत ९३.६० टक्के गुण
आदित्य वेल्हाळ ल्ल कोल्हापूर
हात व पायांची न होणारी हालचाल, वयाच्या नवव्या वर्षापासून बंद झालेले चालणे; जेवण असो की दिनक्रमातील कोणतेही काम; ते आईवडिलांच्या मदतीनेच पूर्ण करणे, अशा आपल्या दुर्धर आजारावर मात करीत प्रशम प्रशांत शेंडे हा विद्यार्थी नूतन मराठी विद्यालयात दहावीच्या परीक्षेत अव्वल ठरला आहे. त्याने ९३.६० टक्के गुण मिळविले.
मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंगशेजारी शेंडे कुटुंबीय राहतात. त्याचे वडील शेतकरी, तर आई मृदुला या फॅशन डिझायनर आहेत. प्रशम हा जन्मानंतर सहा वर्षांपर्यंत इतर मुलांप्रमाणेच चालत होता. तो पहिलीमध्ये प्रवेशित झाल्यानंतर त्याच्या चालण्यात फरक जाणवू लागला. त्यावर आई-वडिलांनी त्याची डॉक्टरांकडून तपासणी केली.
यावेळी प्रशमला ‘ड्युशन मस्क्युलर डिस्ट्रॉफी’ (डीएमडी) हा स्नायूंचा आजार असल्याचे त्यांना समजले. त्याच्यावर उपचार सुरू ठेवत त्यांनी त्याला गुरुमहाराज वाड्यातील नूतन मराठी ब्रँचमध्ये शिक्षणासाठी दाखल केले. चौथीमध्ये गेल्यावर ‘डीएमडी’मुळे त्याच्या हातापायांची हालचाल पूर्णत: थांबली. त्यावर खचून न जाता त्याची शिक्षणाची आवड, मिळविलेले यश पाहून आई मृदुला यांनी त्याला पुढे शिकविण्याचे ठरविले. त्याला दररोज काखेतून शाळेत आणणे व घेऊन जाणे त्या करीत होत्या. आईच्या आधाराच्या जोरावर त्याने जिद्दीने शिक्षण सुरूच ठेवले. आठवीसाठी तो मिरजकर तिकटी येथील नूतन मराठी विद्यालयात दाखल झाला.
निव्वळ अभ्यास हाच त्याचा दिनक्रम आणि आवड होती. त्यामुळे आजतागायत त्याने शाळेतील आपला पहिला क्रमांक सोडला नाही. दहावीत त्याने ९३.६० टक्के गुणांची कमाई केली असून संस्कृत (९८), सामाजिकशास्त्र (९४), मराठी (९३), इंग्रजी (९०), गणित (९३), विज्ञान व तंत्रज्ञान (८८) असे लक्षवेधक गुण मिळविले आहेत.