स्कूटरवरून आईला जगभ्रमंती, म्हैसूरमधील डी. कृष्णकुमार यांनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन
By संदीप आडनाईक | Published: October 18, 2023 07:28 PM2023-10-18T19:28:52+5:302023-10-18T19:30:38+5:30
नोकरीचा राजीनामा देऊन ही 'मातृ संकल्प यात्रा' सुरू केली
कोल्हापूर : आई-वडिलांना कावडीतून यात्रा घडविणाऱ्या श्रावणबाळाची आठवण करून देणाऱ्या आजच्या युगातील आधुनिक श्रावणबाळ म्हैसूर येथील डी. कृष्णकुमार यांनी आपल्या ७३ वर्षीय आई चुडालम्मा यांच्यासाठी 'मातृ संकल्प यात्रा' पूर्ण करीत आणली आहे. त्यांनी आज, बुधवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.
वडिलांनी दिलेल्या २२ वर्षे जुन्या स्कूटरवरून गेल्या पाच वर्षात त्यांनी आतापर्यंत ७७ हजार ७८२ किलोमीटरचा टप्पा पार करून भारतासह चार देशांचा प्रवास पूर्ण केला आहे. आज ते कोल्हापुरात आले होते. उद्या सांगलीला निघाले आहेत. बेंगळुरूमधील विविध आयटी कंपन्यामध्ये ४५ वर्षीय डी. कृष्णकुमार यांनी कॉर्पोरेट टीम लीडर म्हणून काम केले. वडिलांच्या निधनानंतर गावी दहा जणांचे कुटुंब असल्याने जबाबदारीमुळे त्यांच्या आईला घराजवळील मंदिरेही पाहता आली नव्हती. त्यामुळे कृष्णकुमार यांनी आईची सेवा करण्यासाठीच ब्रम्हचारी रहात ३० वर्षाच्या नोकरीचा राजीनामा देऊन ही 'मातृ संकल्प यात्रा' सुरू केली.
म्हैसूरपासून सुरू झालेल्या या यात्रेत त्यांनी भारतासह नेपाळ, म्यानमार आणि भूतान या चार देशांची यात्राही आईला घडविली. या यात्रेमध्ये त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. वडिलांच्या बजाज चेतकलाच ते वडील मानतात. या स्कूटरवरून १६ जानेवारी २०१८ रोजी म्हैसूरहून त्यांनी ही यात्रा सुरु केली. दोन वर्षे प्रवास केल्यानंतर भूतानच्या सीमेवर असताना कोविडमुळे घरी परतावे लागले. या दीड वर्षात ते घरीच होते. त्यानंतर लसीचे डोस घेऊन १५ ऑगस्ट २०२२ रोजी पुन्हा या यात्रेला सुरुवात झाली.
उत्तर भारताचा दौरा करून ते आता महाराष्ट्रात आले आहेत. या प्रवासात ते मठ, मंदिरे, गुरुद्वारांत मुक्काम करतात. हॉटेलऐवजी तेथीलच अन्न ते ग्रहण करतात. प्रवासाची ठरावीक वेळ निश्चित नसते. वातावरणाचा अंदाज घेत, सायंकाळपर्यंत प्रवास सुरू असतो, अशी माहिती डी. कृष्णकुमार यांनी दिली.
'पालकांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणी काढण्यापेक्षा ते जिवंत असतानाच त्यांची सेवा केली पाहिजे. लहानपणापासून कष्ट करणाऱ्या आई-वडिलांची वृद्धत्वामुळे आबाळ होणार नाही, त्यांच्या सर्व इच्छा मुलांनी पूर्ण केल्या पाहिजेत, असे मी मानतो. - डी. कृष्णकुमार