आईकडूनच नवजात मुलीला पुरण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 06:04 PM2017-08-29T18:04:17+5:302017-08-29T18:07:48+5:30
कोल्हापूर : जन्मत:च ओठ व टाळा दुभंगलेल्या अवस्थेत जन्माला आलेल्या नवजात मुलीला कापडात गुंडाळून खड्ड्यात पुरण्याचा जन्मदात्री आई आणि आजीचा प्रयत्न गांधीनगर पोलिस आणि नागरिकांनी मंगळवारी हाणून पाडला. त्यांच्या या सतर्कतेमुळे एक दिवसाच्या या नवजात मुलीचा जीव वाचला. ही घटना गडमुडशिंगी (ता.करवीर) येथील शांतीप्रकाशनगर येथे घडली.
याप्रकरणी आई सारिका लखन मोरे (वय २६, मूळ राहणार तासगांव रोड, ता.मिरज, जि. सांगली ) आणि आजी नकोशा सिद्धाप्पा भोसले (वय ४८, रा. शांतीप्रकाश नगर, गड मुडशिंगी, ता. करवीर) यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा गांधीनगर पोलिसांत नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, गांधीनगर रेल्वे फाटक येथील लखन मोरे यांना पहिल्या पत्नीपासून चार मुली आहेत. त्यामुळे त्यांनी सारिका हिच्याशी दुसरा विवाह केला. सारिका ही सोमवारी (दि.२८) तिच्या आईच्या घरात प्रसृत झाली. पण, या एक दिवसाच्या नवजात मुलीचे ओठ जन्मत:च दुभंगलेले होते. त्यातच मुलगी झाल्याने पती नांदवणार नाही, या भितीने मंगळवारी सकाळी आई सारिका आणि आजी नकोशा भोसले यांनी बाळाला पुरण्यासाठी कापडात गुंडाळले.
आजी नकोशा हिने आपल्या राहत्या घराच्या पाठीमागे खड्डा काढला, त्यानंतर त्या दोघींनी बाळाला खड्डयात ठेवले. दरम्यान, या प्रकाराची कुणकुण शेजाºयांना लागली. त्यांनी हा प्रकार परिसरातील नागरिकांना सांगितला. त्यांनी याची माहिती तत्काळ गांधीनगर पोलिसांना दिली.
माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, महिला पोलिस नाईक सुप्रिया कचरे, अंजली सावंत आदी घटनास्थळी आले. त्यांनी या नवजात मुलीला पुरत असताना त्या दोघींना रंगेहाथ पकडले. नंतर गांधीनगर पोलिस ठाण्यात आणून या दोघींवर भारतीय दंडविधान संहिता कलम ३०७, ३१५ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सारिका आणि या नवजात मुलीला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) प्रसुती विभागात दाखल करण्यात आले आहे.
बाळाचे वजन ३.२ किलो असून ते ठणठणीत आहे. स्माईल ट्रेड या उपचारपद्धतीमुळे दुभंगलेले ओठ व टाळ्याची शस्त्रक्रिया होऊ शकते.
-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता,
राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, कोल्हापूर.