अश्विनी बिंद्रेंच्या खुनाच्या बातमीने आईची स्मृती हरपली, पतीलाही ओळखू शकत नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 05:02 AM2018-03-03T05:02:19+5:302018-03-03T10:22:46+5:30
गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिंद्रे यांचा क्रूरपणे खून झाल्याचे उघड होताच त्यांच्या आई-वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे.
- एकनाथ पाटील
कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिंद्रे यांचा क्रूरपणे खून झाल्याचे उघड होताच त्यांच्या आई-वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. आई निर्मला यांची स्मृती हरपली आहे. ‘संशयित अभय श्यामसुंदर कुरुंदकर व त्याच्या साथीदारांना न्यायालयाने फाशी द्यावी,’ अशी मागणी गोरे-बिंद्रे कुटुंबीयांनी केली आहे.
अश्विनी बिंद्रे खूनप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार अभय शामसुंदर कुरुंदकर (वय ५२, रा. भार्इंदर पूर्व, जि. ठाणे), एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजू पाटील (४४, रा. तळवेल, ता. भुसावळ, जि. जळगाव), कुरुंदकरचा कारचालक कुंदन नामदेव भंडारी (५१, रा. भंडारी हाऊस, बंदरपाडा, कांदिवली, मुंबई), कुरुंदकरचा बालपणीचा मित्र महेश फळणीकर (रा. आजरा) या चौघांना अटक केली आहे.
अश्विनी बिंद्रे यांच्या खुनाची कबुली कुरुंदकरचा बालपणीचा मित्र महेश फळणीकर याने दिल्याने तपासाची गती वाढली आहे. अतिशय क्रूरपणे बिंद्रे याचा खून करण्यात आला आहे. संशयितांनी लाकूड कापण्याच्या इलेक्ट्रिक कटरने त्यांच्या शरीराचे तुकडे करून ते घरी आणले. त्यांतील काही भाग फ्रिजमध्ये ठेवला. रात्रभर फ्लॅटवर झोपून दुसºया दिवशी मित्रांच्या मदतीने समुद्राच्या खाडीत मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची फळणीकर याने कबुली दिली आहे.
मुलीचा क्रूरपणे खून झाल्याचे समजताच वडील जयकुमार बिंद्रे, आई निर्मला यांना जबर मानसिक धक्का बसला आहे. निर्मला यांना समोर उभी असणारी व्यक्तीही ओळखता येत नाही. स्वत:च्या पतीला त्या ओळखत नाहीत, इतका मोठा मानसिक आघात त्यांच्यावर झाला आहे. त्यांची स्मृती हरपली आहे. बिंद्रे यांच्या खुनाची कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे. अश्विनी यांचे माहेर आळते या गावी हळहळ व्यक्त केली जात आहे. बिंद्रे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी नातेवाईक, स्थानिक नागरिकांची रीघ लागली आहे. पोलिसांची दोन पथके आजºयामध्ये तळ ठोकून आहेत.
>> या संपूर्ण खुनाचा छडा मुंबईतील सहायक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांनी लावला आहे. महाराष्टÑातील पोलीस अधिकाºयांनी या तपासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कुरुंदकरविरोधात भक्कम पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. आता या खुनाच्या तपासाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करून सैतान कुरुंदकरला फाशी द्यावी, अशी आमची मागणी आहे. - राजू गोरे, अश्विनी बिंद्रे यांचे पती