मोतीबाग तालीम, ‘कृष्णजा’ गर्दीने फुलून गेले...
By admin | Published: June 23, 2014 12:46 AM2014-06-23T00:46:35+5:302014-06-23T00:50:07+5:30
गणपतराव आंदळकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव : फटाक्यांची आतषबाजी, साखर-पेढे वाटून आनंदोत्सव
कोल्हापूर : कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल यावर्षीचा राजर्षी शाहू पुरस्कार हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना जाहीर झाल्याचे वृत्त समजताच आज, रविवारी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवरून आंदळकर यांना शुभेच्छा दिल्या. न्यू पॅलेस परिसरातील ‘कृष्णजा’ बंगला आणि भवानी मंडपातील मोतीबाग तालीम गर्दीने फुलली होती. तालमीतील मल्लांनी फटाक्यांची आतषबाजी करत, साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच कुस्ती तसेच अन्य क्षेत्रांतील मान्यवर हिंदकेसरी आंदळकर यांच्या ‘कृष्णजा’ बंगल्यात दुपारी दोन वाजल्यापासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येऊ लागले. त्यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, संजय जाधव, फिरोज बारगीर, शुभांगी साळोखे, सुजाता सोहनी, सुमन शिंदे, संगीता चौगुले, दत्ता दाभोळे, प्रवीण पालव, बापू कोळेकर, आदींनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हिंदकेसरी आंदळकर हे मोतीबाग तालमीत आले. याठिकाणी मल्लांनी फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत केले. याठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी हिंदकेसरी आंदळकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, ‘बीड’चे वस्ताद संजय कसबे, उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार आदींसह मल्ल मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)