महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या स्लीपरचे दोन डबे रद्द करण्याच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 05:23 PM2024-11-20T17:23:54+5:302024-11-20T17:24:07+5:30
डबे वाढवण्याची प्रवासी संघटनांची मागणी : अनारक्षित दोन डबे वाढवण्याचा निर्णय चुकीचा
कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई आणि परत महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसच्या शयनयानचे दोन डबे कमी करून जनरलचे अनारक्षित दोन डबे वाढवण्याच्या मध्य रेल्वेच्या हालचालींना रेल्वे प्रवासी संघटनेने विरोध केला आहे. या रेल्वेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असूनही ऐन हंगामात डबे वाढवण्याची मागणी केली असता ते कमी करण्याचा प्रकार रेल्वे करत असल्याबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी रोज पाचशे ते सहाशे प्रवासी प्रतीक्षेत असतात.
तिरुपती-कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक १७४१५/१७४१६) आणि कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर (ट्रेन क्रमांक १७४११/१७४१२) महालक्ष्मी एक्स्प्रेसचे २१ एलएचबी कोचसह धावते आहे. ही गाडी रोज रात्री ८.५० वाजता कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून सुटते. या रेल्वेसेवेला प्रवाशांची मोठी मागणी आहे. या रेल्वेला अलीकडेच जादा एलएचबी कोच जोडले आहेत. प्रवासी या नवीन वाढीव कोचमधून आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा आनंद घेत असतानाच रेल्वे प्रशासनाने हा नवा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
व्यवसाय, शिक्षण तसेच पर्यटनासाठी रोज हजारो प्रवासी या रेल्वेमधून प्रवास करत असतात. या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी रोज पाचशे ते सहाशे प्रवासी प्रतीक्षेत असतात. प्रवासी संघटनांनी यासाठी दोन आरक्षित स्लीपर डबे वाढवण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती आणि ती मागणी मंजूरही झाली होती. तसे पत्रही कोल्हापूर रेल्वे स्थानक प्रमुखांकडे आले असताना त्यात जनरलचे दोन डबे वाढविल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात शयनयानचे दोन डब्बे रद्द करूम स्लीपर एक्स्ट्रा कोचचे दोन डबे वाढवले जात आहेत. आतातर स्लीपरचेच दोन डब्बे रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आता रेल्वेने याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
या गाडीला सद्या २१ डबे जोडलेले आहेत. रोज ५०० ते ६०० प्रवाशांची प्रतिक्षा असल्यामुळे या गाडीच्या स्लीपरसोबत जनरल डब्यांची संख्या वाढविण्याची प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेकडे लेखी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर या रेल्वेने डबे रद्द करण्याच्या सुरु केलेल्या हालचालींमुळे प्रवाशी संघटना संतप्त झाल्या आहेत.