जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:24+5:302021-06-02T04:19:24+5:30
गडहिंग्लज : अपयशातून खचून गेलेल्यांना प्रेरणा नवी ऊर्जा प्रदान करते. प्रत्येकाला आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते, ...
गडहिंग्लज : अपयशातून खचून गेलेल्यांना प्रेरणा नवी ऊर्जा प्रदान करते. प्रत्येकाला आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते, असे प्रतिपादन हरीकाका गोसावी ऋग्वेदी मठाचे पीठाधीश डॉ. आनंद गोसावी यांनी केले.
हत्तरकी (जि. बेळगाव) येथे प. पू. सदगुरू एकनाथ महाराज गोसावी यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील श्री हरिकाका मठातर्फे सीमाभागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना देणाºया येणा-या शिष्यवृत्ती वितरणप्रसंगी ते बोलत होते. हुक्केरीचे गटशिक्षणाधिकारी मोहन दंडीन यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोसावी म्हणाले, प्रेरणेच्या माध्यमातून व्यक्ती दुप्पट गतीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करते. प्रेरणा आपल्याला जीवन जगण्याची एक नवीन उमेद देते.
दंडीन म्हणाले, समाजातील गरीब मुलांना शिष्यवृत्ती देवून मठाने सामाजिक बांधिलकी जोपासली असून मठाचे कार्य कौतुकास्पद आहे.
प्रारंभी एकनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यासह सीमाभागातील पन्नास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आली. डॉ. श्रीशैल मठपती, एम. आर. घस्ती, संजय थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी वेणुगोपाल गोसावी, चारुदत्त गोसावी, अनिल पोतदार, एस. ए. कुलकर्णी, डी. एन. कुलकर्णी, नंदकुमार माळी आदी उपस्थित होते.
पी. बी. आवलक्की यांनी स्वागत केले. डॉ. सुनील देसाई यांनी प्रास्ताविक केले. संतोष पवार यांनी आभार मानले.
-------------------------
फोटो ओळी : हत्तरकी (जि. बेळगाव) येथील श्री हरिकाका मठातर्फे देण्यात येणा-या शिष्यवृत्तीचे वितरण हुक्केरीचे गटशिक्षणाधिकारी मोहन दंडीन यांनी केले. यावेळी मठाचे पीठाधीश डॉ. आनंद गोसावी, सुनील देसाई आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०१०७२०२१-गड-०७