महागावातील गणेश मूर्तिकारांपुढे अडचणींचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:53+5:302021-06-29T04:16:53+5:30
गेली पन्नास वर्षे शेडूच्या मूर्ती करणारे येथील मूर्तिकार चंद्रकांत सुतार यांनी या व्यवसायाबद्दल आपली व्यथा मांडताना सांगितले की, शेडूच्या ...
गेली पन्नास वर्षे शेडूच्या मूर्ती करणारे येथील मूर्तिकार चंद्रकांत सुतार यांनी या व्यवसायाबद्दल आपली व्यथा मांडताना सांगितले की, शेडूच्या मूर्ती करणे हे आमच्या घराण्यात परंपरागत चालत आले आहे. शेडूची मूर्ती ही पाण्यात विरघळत असल्याने ती पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे कमी श्रमात, कमी वेळेत होत असलेल्या प्लॅस्टरचा फायदा असतानाही आम्ही हा मार्ग स्वीकारला नाही. शेडूच्या मूर्तीसाठी खूपच मेहनत घ्यावी लागते. तसेच शेडू आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. पूर्वी शेडूचा दहा किलोचा भाव ४० रुपये होता. आता त्यासाठी शंभर रुपये मोजावे लागतात. यातही तीन किलो तूट निघते.
मूर्ती एकसंघ राहण्यासाठी शेडूत मोठ्या प्रमाणात कापूस मिसळून ही शेडू मूर्ती योग्य बनवावी लागते. सातत्याने पाऊस असेल तर मूर्ती सुकविण्यासाठी हीटरसारख्या उष्णतेची स्वतंत्र व्यवस्था करावी लागते. यातून खर्चाचे प्रमाण वाढत जाते.
रंगांच्या किमतीही वर्षाला वाढत असतात. सोनेरी रंगाचा जास्त वापर होत असतो. हा रंग ६ रुपये तोळा मिळत होता. मात्र, आता १८ रुपये तोळा आहे. एकूण खर्चाचे प्रमाण पाहता हातात अत्यल्प पैसे पडतात. परंपरागत व्यवसाय टिकावा यासाठी आमची धडपड असते.
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही आता प्लॅस्टरच्या तयार मूर्ती कमी किमतीत उपलब्ध करून देणारे व्यावसायिक पुढे येत आहेत. त्यामुळे शेडूच्या मूर्तींचा ग्राहक कमी होत आहे. यातून शेडूच्या मूर्तिकारांपुढे अनेक समस्या उभ्या राहत असून, अशा मूर्तिकारांची संख्याही कमी होताना दिसत आहे.