म्हैसाळ आवर्तन बंद होणार!
By admin | Published: October 4, 2015 10:34 PM2015-10-04T22:34:50+5:302015-10-04T23:52:56+5:30
थकबाकी वाढली : पाच कोटींची भर, आठवड्याभरात ‘पॅकअप’ची चिन्हे
मिरज : अवर्षणामुळे दीड महिने सुरू असलेल्या म्हैसाळ योजनेचे पाच कोटी रुपये वीजबिल आहे. पाणीबिल वसुली नसल्याने आठवड्याभरात म्हैसाळ योजना बंद होण्याची चिन्हे आहेत. म्हैसाळचे पाणी जतपर्यंत पोहोचले असून, सध्या सोनी, भोसे, मणेराजुरी परिसरात पाणी सोडण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील दहा पंपांसह पाच टप्प्यातील ७३ पंपांव्दारे नदीपात्रातून प्रतिसेकंद १५० क्युसेक्स पाणी उपसा सुरू आहेत. अवर्षण व पाणी टंचाईमुळे दि. २५ आॅगस्टपासून म्हैसाळ योजना सुरू करण्यात आली. पाणी टंचाईमुळे जतपर्यंत पाणी सोडून व तलाव भरण्यात आले. टंचाई परिस्थितीमुळे दोन महिने म्हैसाळचे आवर्तन सुरू ठेवण्यात येणार होते. पाच टप्प्यातील ७३ पंप सुरू असल्याने व महावितरणने कृषीदरात प्रति युनिट ४४ पैसे दरवाढ केल्याने दीड महिन्यात पाच कोटी रूपये विजबिल झाले आहे. म्हैसाळची सुमारे २० कोटी थकबाकी वसुलीसाठी शेकऱ्यांच्या सात-बारावर बोजा नोंद करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाकडून लाभक्षेत्रातील पिकांची मोजणी सुरू आहे. नवीन वीजबिलामुळे थकबाकी २५ कोटींवर पोहोचणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात पाऊस झाल्याच्या कारणावरून म्हैसाळचे आवर्तन बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. म्हैसाळच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र सक्तीने थकबाकी वसुलीच्या पाटबंधारेच्या निर्णयामुळे संघर्षाची चिन्हे आहेत. योजना बंद करण्यात येऊ नये, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)
सुरुवातीपासूनच सतावतोय पाणीपट्टीचा प्रश्न...
म्हैसाळ योजनेच्या सुरुवातीपासूनच अपूर्ण कालवे व थकित पाणीपट्टीचा प्रश्न सतावत आहे. गेल्या दहा वर्षातील म्हैसाळ योजनेतील आवर्तनावर नजर टाकली असता, केवळ राजकीय दबावाखाली आणि टंचाई निधीच्या भरवशावरच रडतखडत का होईना, योजना सुरू असल्याचे दिसून येते. मुळात या योजनेची मुहूर्तमेढ रोवताना, ‘शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेली योजना’, अशी संकल्पना होती. मात्र, वाढलेला राजकीय हस्तक्षेप व योजनेच्या पाण्यावर सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतील राजकारण फिरत असल्याने, पूर्ण क्षमतेने योजना चालविण्यात अडचणी येत आहेत. त्यात योजनेचे पोटकालवे अपूर्ण असल्याने पाण्याचा वापर न करताच थकबाकी सात-बारावर येण्याची वेळ लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांवर आली आहे.
सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना अंशत: का होईना, म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा लाभ मिळत आहे. या तालुक्यांतील ८१ हजार ६९७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून सद्य स्थितीला ३२ हजार हेक्टरला पाण्याचा लाभ होत आहे.