‘मोरया’च्या गजरात मंगलमूर्ती विराजमान बाप्पांचे जल्लोषी स्वागत : कुंभार गल्लींमध्ये आबालवृद्धांची गर्दी,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:12 AM2018-09-14T01:12:00+5:302018-09-14T01:13:17+5:30
कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष... ढोल-ताशा या पारंपरिक वाद्यांचा ताल, फटाक्यांची आतषबाजी, सुरेख आराशीची मांडणी, आरती, धूप-दीपाने आलेला भक्तीचा सूर, गणरायाची सुरेल गाणी, खीर-मोदकासह सुग्रास नैवेद्य अशा जल्लोषात गुरुवारी घरोघरी प्रथमपूज्य, बुद्धिदाता, विघ्नहर्त्या मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने अवघे कोल्हापूर आपल्या लाडक्या बाप्पाच्या भक्तीत रंगून गेले होते.
ज्याच्या आगमनाची भक्त गेले वर्षभर वाट पाहत होते, आठ दिवसांपासून ज्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती, नावीन्यपूर्ण आणि कलात्मक संकल्पनांना बहर आला होता, अशा या आबालवृद्धांच्या आवडत्या गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा दिवस गुरुवारी उगवला. गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधून देव आज घरोघरी येणार होता. त्यामुळे गुरुवारचा दिवस उजाडला तो भल्या पहाटे. घरादाराची झाडलोट झाली, अंगणात सप्तरंगांनी रांगोळी सजली, काही ठिकाणी फुलांचीच आरास आणि पायघड्या तयार झाल्या.
रात्री उशिरापर्यंत जागून केलेल्या आराशीतील करायच्या राहून गेलेल्या गोष्टींची पुन्हा नव्याने मांडणी झाली. पूजेच्या साहित्याची तयारी झाली आणि या सगळ्या लगबगीत नटून-सजूून तयार झालेल्या बच्चेकंपनीचा उत्साह म्हणजे अवर्णनीय; तर स्वयंपाकघरातून घरात खीर, मोदकाच्या सुग्रास अन्नाचा घमघमाट सुटला.
दुसरीकडे, गेले तीन महिने जेथे देव घडविण्याचे काम सुरू होते, त्या कुंभार गल्लीला तर जत्रेचे स्वरूप आले होते. सकाळी सहा वाजल्यापासूनच भाविक आपला लाडका देव नेण्यासाठी येत होते. मोठ्या कष्टाने बनविलेला देव त्यांच्या हाती सुपूर्द करताना कुंभारबांधवांची घाई सुरू होती. येथून उत्साही भाविक ढोल-ताशांच्या मिरवणुकीने बाप्पांना घरी घेऊन जात होते.
भक्तांच्या घरी जाण्यासाठी कुंभारवाड्यांमध्ये मूर्तीच्या रूपात सज्ज असलेल्या बाप्पांची स्वारी कुठे चारचाकी वाहनातून, तर कुठे दुचाकीच्या मागच्या सीटवरून तर कुठे सजवलेल्या हातगाड्यांवरून निघाली होती. पापाची तिकटी कुंभार गल्लीतून महाद्वार रोडमार्गे अनेक मूर्ती मिरवणुकीने जात असल्यामुळे हा मार्ग ‘मोरया’च्या गजराने दणाणून गेला. उपनगरांतील भक्तांनी चारचाकीतून बाप्पांच्या आगमनाची मिरवणूक घरापर्यंत नेली.
दारात येताच सुवासिनींनी गणेशमूर्तीचे औैक्षण केले, नजर काढली आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात बाप्पांनी भक्तांच्या घरात पहिले पाऊल ठेवले. सुंदर आराशीच्या मधोमध प्रतिष्ठापना झाली. पंचामृत, अभिषेक, प्रसाद, आरती, सुवासिक धूप-अगरबत्तीने भक्तीचा सुगंध घरभर पसरला. पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटात नैवेद्य दाखविण्यात आला नंतर कुटुंबीयांनी मिळून जेवणाचा आस्वाद घेतला. दुपारनंतर मंडळांच्या गणेशमूर्तीच्या मिरवणुका सुरू झाल्या.
आरिफ पठाण यांची मोफत रिक्षासेवा
दरवर्षीप्रमाणे यंदाही कुंभार गल्लीत गणरायाची मूर्ती नेण्यासाठी आलेल्या भक्तांसाठी रिक्षाचालक आरिफ पठाण यांनी मोफत रिक्षा सेवा दिली. भक्त गणेशमूर्ती घेऊन पायी घरी जात असताना पठाण यांनी त्यांना मोफत सवारी दिली.
शाहूपुरी व पापाची तिकटी कुंभार गल्ली येथे त्यांनी यासाठी सहा रिक्षा उपलब्ध करून ठेवल्या होत्या. त्यांनी ३०० हून अधिक गणेशमूर्ती घरी पोहोच केल्या. रुईकर कॉलनी येथील संतोष मिरजे यांनीही दिवसभरात ७० लोकांना सेवा दिली.
शाहूपुरी कुंभार गल्ली येथून रिक्षाचालक किरण ठोकळे यांनी दिवसभरात २२ गणेशभक्तांना त्यांच्या घरी जाण्यासाठी आपल्या रिक्षातून सोडले. यात कसबा बावडा, सदर बझार, उद्यमनगर, कनाननगर, फुलेवाडी, पाचगाव, आर. के. नगर, आदी ठिकाणी त्यांनी ही मोफत सेवा दिली. गेले चार वर्षांपासून ठोकळे गणेश भक्तांना अशी मोफत सेवा देत आहेत.
बाजारपेठांत शुकशुकाट
बुधवार मध्यरात्रीपर्यंत गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सजलेल्या बाजारपेठा गुरुवारी शांत होत्या. सजावटीच्या साहित्याचे स्टॉल्स, मिठाईची दुकानेवगळता दुपारपर्यंत शहरातील प्रमुख बाजारपेठांतील दुकाने बंद होती. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून घाईगर्दीने गजबजलेल्या बाजारपेठांनीही गुरुवारी विश्रांती घेतली.