रमाबाई सूतगिरणीला बेकायदेशीर कर्ज देणाऱ्याविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:23 AM2021-03-15T04:23:16+5:302021-03-15T04:23:16+5:30
काेल्हापूर : कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त केला ...
काेल्हापूर : कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त केला आहे. तरीही संचालक बँका, वित्तीय संस्था व व्यापाऱ्यांकडून कोट्यवधीचे कर्ज उचल करण्याचा प्रयत्न करत आहेत, यामुळे संस्था आणखी अडचणीत येणार असून कर्ज घेतल्यास त्यांच्यासह संबंधित कर्ज देणाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करू, असा इशारा रमाबाई आंबेडकर सूतगिरणी सत्यशोधन समितीचे प्रशांत चांदणे व सूतगिरणीचे संस्थापक संचालक सर्जेराव भोसले यांनी पत्रकातून दिला.
शासनाकडून सूतगिरणीस ९५ टक्के शासकीय अर्थसाहाय्य मिळूनही गिरणीचे बांधकाम निम्मेही झालेले नाही. एकूणच सूतगिरणी मोडून खाण्याचा प्रकार झाला असून, वस्त्रोद्योग आयुक्तांनी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त केला आहे. याविरोधात संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने फेटाळून लावत राज्य शासनाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले. मात्र, अध्यक्षांसह काही संचालक सूतगिरणीची मालमत्ता तारण देऊन बँका, वित्तीय संस्था व सूत व्यापाऱ्यांकडून कोट्यवधीचे कर्ज उचल करण्याच्या प्रयत्नात आहेत. बरखास्त केलेल्या संचालकांना संस्थेची मालमत्ता तारण देऊन कर्ज काढता येत नाही. तरीही हा प्रकार सुरू आहे. याविरोधात अध्यक्षांसह संचालकांच्या दारात आंदोलन करणार आहे. त्याचबरोबर कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या दारातही आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रशांत चांदणे व सर्जेराव भोसले यांनी पत्रकातून दिला.