अंबाबाई मंदिराबाहेरील स्वच्छतागृहाविरोधात आंदोलन
By admin | Published: July 7, 2017 05:38 PM2017-07-07T17:38:20+5:302017-07-07T17:38:20+5:30
शिवसेना महिला आघाडीने महापालिकेच्याविरोधात दिल्या घोषणा
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरच्या दक्षिण दरवाजा बाहेरील परिसरातील स्वच्छतागृहाच्या अस्वच्छतेविरोधात शुक्रवारी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी स्वच्छतागृह परिसरात हातात झाडू घेऊन महापालिका व ठेकेदाराच्या विरोधात घोषणा दिल्या.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष शुभांगी पोवार व शहराध्यक्ष रिया पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन महापालिका आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना देण्यात आले.
अंबाबाईला येणाऱ्या भक्तांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत तर आहेत त्या स्वच्छतागृहांची नीगा ठेकेदारांकडून राखण्यात आलेली नाही, असे यात म्हटले आहे.
यावेळी अध्यक्षा पोवार म्हणाल्या, करवीरनिवासिनी अंबाबाई ही देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो भक्त देवीच्या दर्शनाला येतात. त्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असते; परंतु मंदिर परिसरात पुरेशी स्वच्छतागृहेच नसल्याने भाविकांची मोठी अडचण होते.
उपलब्ध स्वच्छतागृहांची स्थिती तर अत्यंत खराब असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. त्याकडे महापालिकेने लक्ष देणे आवश्यक आहे. रिया पाटील म्हणाल्या, येणाऱ्या भाविकांना नाईलाजाने स्थानिक नागरिकांकडे स्वच्छतागृहासाठी विनंती करावी लागते.
संबंधित ठेकेदार पैसे घेतात पण स्वच्छता ठेवत नसल्याने दयनीय अवस्था झाली आहे.
प्रशासनाने स्वच्छतागृहांची संख्या वाढवून त्याची स्वच्छता ठेवण्याच्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल.
दरम्यान, आरोग्य निरीक्षक यांनी संबंधित ठेकेदाराला आठ दिवसांत स्वच्छतागृहांबाबाबत अहवाल देण्याची नोटीस बजावली आहे.
यावेळी सुजाता सोहनी, दीपाली शिंदे, सुनीला निकम, सुवर्णा कारंडे, कमल पाटील, गिरीजा गायकवाड, लीना भोसले, सुनीता जगताप, वंदना पाटील, यमुना जाधव, सुरेखा जहागीर यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.