पवारांच्या दौऱ्यावेळीही टोलविरोधात आंदोलन

By admin | Published: September 11, 2014 10:58 PM2014-09-11T22:58:07+5:302014-09-11T23:17:36+5:30

कृती समितीचा इशारा : निर्णय घ्या, अन्यथा हिसका दाखवू

Movement against toll during Pawar's tour | पवारांच्या दौऱ्यावेळीही टोलविरोधात आंदोलन

पवारांच्या दौऱ्यावेळीही टोलविरोधात आंदोलन

Next

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पुढील आठवड्यात कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांत टोलबाबत शासनाने निर्णय घ्यावा. पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर येताना ‘टोल रद्द’चे पत्र घेऊन यावे. कोल्हापूरकर त्यांचे जल्लोषी स्वागत करतील. अन्यथा सत्ताधाऱ्यांना येत्या निवडणुकीत हिसका दाखविण्याबरोबरच मागील वेळीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज, गुरुवारी येथे झालेल्या सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला. अध्यक्षस्थानी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे होते.
कोल्हापूरच्या टोलबाबत निर्णय घेण्यास सरकार चालढकल करीत आहे. दोन दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी टोल रद्दचा निर्णय घ्यावा, अशा आशयाचे निवेदन शरद पवार यांना फॅक्सद्वारे पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यानंतरही टोलबाबत निर्णय न घेताच पवार कोल्हापूर दौऱ्यावर आल्यास उग्र्र आंदोलन करण्याचे बैठकीत ठरले. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी पुन्हा दोन दिवसांत बैठक घेण्याचे ठरले. बैठकीसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, नगरसेवक सत्यजित कदम, रविकिरण इंगवले, अशोक पोवार, बाबा पार्टे, रामभाऊ चव्हाण, बाबा महाडिक, सुरेश जरग, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, अनिल घाटगे, रघुनाथ कांबळे, भालचंद्र कुलकर्णी, चंद्रकांत यादव, आदी उपस्थित होते.

आंदोलनाबाबत मते
टोल विरोधी कृती समितीमध्ये सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने काहींनी राजकीय पोळी भाजण्याचाही बैठकीत प्रयत्न केला. वैयक्तिक टीकाही झाली. याचे बैठकीत पडसाद उमटले. टोल विरोधी आंदोलन हे कोणा एका पक्षाला संपविण्यासाठी सुरू झालेले आंदोलन नाही. टोल हद्दपार करणे, हाच मुद्दा आंदोलनाचा भविष्यातही मुद्दा असेल, अशा प्रकारेच आंदोलनाची दिशा राहू द्या, असे मत अनेकांनी मांडले.

मंत्र्यांनी घात केला
जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी टोल विरोधी आंदोलन अंतिम टप्प्यात असताना ‘खो’ घातला. दोन्ही मंत्र्यांमुळेच सुटणारा टोलप्रश्न लांबणीवर पडला. टोल हा दोन्ही मंत्र्यांचाच प्रश्न आहे. ते यातून जबाबदारी झटकू शकत नाहीत. टोलचा प्रश्न न मिटल्यास येत्या निवडणुकीत कोल्हापूरची जनता हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.

निवास साळोखे : जनतेच्या भावनांशी खेळणे थांबवा, निर्णय घ्या.
अनिल घाटगे : निवडणूक जाहीरनाम्यात टोलमुक्तीचे आश्वासन देणाऱ्या, सत्तेच्या जवळ जाणाऱ्या पक्षाला पाठिंबा द्या.
भगवान काटे : सत्ताधाऱ्यांनी कोल्हापूरकरांना मूर्ख समजू नये. योग्य वेळी ते हिसका दाखवतील.
बाबा पार्टे : मागील वेळीपेक्षा उग्र आंदोलन करू.
सत्यजित कदम : मी टोलविरोधी कृती समितीसोबतच आहे.
रवी इंगवले : टोलविरोधी आंदोलनामुळे तिकीट मिळणार नाही, अशी काहींना भीती.
अशोक पवार : जनतेला वेठीला न धरता सत्ताधाऱ्यांना हिसका दाखवू.
बजरंग शेलार : दोन्ही मंत्र्यांमुळेच घात झाला.
दिलीप देसाई : टोलबाबतच्या सर्व व्यवहारांत ही राजकीय मंडळी सहभागी आहेत.
बाबा इंदुलकर : आघाडीच्या सरकारला टोलबाबत निर्णय घ्यायचाच नाही.
रामभाऊ चव्हाण : आता कोल्हापुरी हिसका दाखविण्याची वेळ आली आहे.

Web Title: Movement against toll during Pawar's tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.