पर्यायी शिवाजी पुलासाठी आंदोलनाचा जोर
By admin | Published: August 4, 2016 12:59 AM2016-08-04T00:59:29+5:302016-08-04T01:23:10+5:30
पूल कालबाह्य : राजकीय पक्षांतून संतप्त प्रतिक्रिया; पुरातत्त्व खात्याचा बाऊ, शासनाने लोकांना धरले वेठीस
कोल्हापूर : महाड-पोलादपूर रस्त्यावरील जुना ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या मार्गावरील ब्रिटिशकालीन १३८ वर्षांच्या शिवाजी पुलाचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या जुन्या शिवाजी पुलाला नव्या पर्यायी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना तो शासनाच्या लाल फितीत अडकला. त्यामुळे पुलाचे काम अर्धवट राहिले. वादग्रस्त ठरलेल्या नव्या पर्यायी पुलाच्या कामाबाबत कोल्हापुरातून राजकीय पक्षांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, काही पक्षांनी आंदोलनाची तयारी केली आहे.
ऐतिहासिक शिवाजी पुलाला पर्यायी असणाऱ्या पुलाचे अर्धवट राहिलेले बांधकाम पूर्ववत सुरू करावे यासाठी कोल्हापुरात सर्वपक्षीय कृती समितीने विविध आंदोलने केली; पण केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडून या पुलाच्या बांधकामाला स्थगिती मिळाल्याने या पर्यायी पुलाचे काम ८० टक्के पूर्ण होऊनही रखडले आहे. महाड येथे ब्रिटिशकालीन पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातीलही जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यायी पुलाच्या अर्धवट राहिलेल्या कामांबाबत आंदोलनाचा पवित्रा घेण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या नेत्यांची आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता आर. के. पोवार यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित केली आहे.
या शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाबाबत शिवसेनेचे शिष्टमंडळ आज, गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता साळोखे यांची भेट घेणार आहेत.
तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पर्यायी शिवाजी पुलासाठी आज, गुरुवारी दुपारी चार वाजता मध्यवर्ती बसस्थानक चौकात निदर्शने होणार आहेत. शहरातील पर्यायी शिवाजी पुलाचे अर्धवट राहिलेले बांधकाम लवकर पूर्ण होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा; अन्यथा ऐतिहासिक शिवाजी पुलाबाबत भविष्यात महाडप्रमाणे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे निवेदन महापालिकेतील काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांनी तौफिकअहमद मुल्लाणी यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त पी. शिवशंकर यांना दिले. यावेळी नगरसेवक संजय मोहिते, प्रतापसिंह जाधव, राहुल माने, उमा बनछोडे, सुभाष बुचडे, मोहन सालपे, इंद्रजित बोंद्रे, आदी उपस्थित होते. पर्यायी शिवाजी पुलाबाबत पुरातत्त्व खात्याचा बाऊ करून शासनाने लोकांना वेठीस धरले आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी राज्य शासनाने पर्यायी पुलाच्या पुढील कामास मंजुरी द्यावी, अशी मागणी स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)