‘अमृत’ला कोथळीतून पाण्यासाठी हालचाली : कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यांतून होणार विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:17 AM2018-05-19T00:17:01+5:302018-05-19T00:17:01+5:30
संतोष बामणे।
उदगाव : इचलकरंजी शहरासाठी दानोळी (ता. शिरोळ) येथून विरोध झाल्यानंतर आता कोथळी-हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमावरून पाणी नेण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. तर २२ मे रोजी मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचे समजल्यानंतर, आता शिरोळ तालुक्यातील दानोळीनंतर कोथळी व सांगली जिल्हा एकवटणार आहे. त्यामुळे वारणा नदीतून इचलकरंजी शहराला पाणी देणार नाही. या मागणीवर वारणाकाठची जनता ठाम असून, कोथळीतून एकही इंच जमीन न देण्याचा निर्णय कोथळी येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.
दानोळी येथील वारणा बचाव समितीने पुढाकार घेतल्यानंतर वारणाकाठावरील मोठ्या संख्येने गावे एकवटली व इचलकरंजी शहराच्या ‘अमृत’ योजनेला विरोध केला. सध्या वारणा बचाव कृती समितीने गावागावांत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्या पाठोपाठच इचलकरंजीनेही उपोषणाला सुरुवात केली आहे. अशातच लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने कोणता तोडगा काढायचा व कोणत्या पद्धतीने इचलकरंजी शहरासाठी पाणी देता येईल, अशा योजना आखल्या जात आहेत. त्यामुळे आता दानोळीकरांनी विरोध दर्शविल्यानंतर कोथळी येथील कृष्णा-वारणा संगम ठिकाणावरून इचलकरंजी शहरासाठी पाणी नेण्याचा घाट रचला जात आहे.
तर मुंबई येथे २२ मे रोजी ‘अमृत’ योजनेच्या समन्वयासाठी बैठक बोलविण्यात आली आहे. त्यामुळे कोथळी-हरिपूर येथील वारणा-कृष्णा संगमाच्या डोहातून इचलकरंजीची अमृत योजना व्हावी, असा मुद्दा मांडला जाणार आहे. तर सध्या हा मुद्दा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या चर्चेत आल्यानंतर सांगलीचे माजी केंद्रीयमंत्री प्रतीक पाटील यांनी काहीही झाले तरी इचलकरंजी शहराला कोथळी-हरिपूर येथून पाणी द्यायचे नाही, या भूमिकेवर ठाम असून, सांगली जिल्हाही वारणा बचाव कृती समितीच्या म्हणण्यावर ठाम आहे. तसेच इचलकरंजी शहराला जर संगमातून पाणी दिले, तर ताकारी, म्हैसाळसारख्या योजनांना पाण्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्वच गावे अमृत योजनेविरोधात एकवटत आहेत.
तर इचलकरंजी शहरासाठी दानोळीनंतर कोथळी गावातून ‘अमृत’ योजना न्यायची झाल्यास गावातून एक इंचही जमीन मिळणार नाही, या भूमिकेवर नागरिक ठाम आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कृष्णा-
वारणा संगमातून इचलकरंजी शहराला पाणी देणार नाही, अशी जनतेची भूमिका आहे. सध्या वारणाकाठाबरोबर कृष्णाकाठावर असलेल्या उमळवाड, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, अंकली, हरिपूर, धामणी यासह अनेक गावांनी पुढाकार घेतला असून, संगमातूनही पाणी मिळणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे जर इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींनी दानोळीनंतर आता कोथळी गावाचा विचार केला असेल, तर कोथळीच्या ग्रामस्थांनी ‘अमृत’ योजनेच्या विरोधात चांगलीच मोट बांधली आहे.
नगरसेवकांच्या जमिनीला पाणी
कृष्णा नदीतून मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा केला जातो. इचलकरंजीतील नगरसेवकांनी शिरढोण व टाकवडे परिसरात जमिनी घेतल्या आहेत. त्या जमिनींना पाणीपुरवठा करण्यासाठी इचलकरंजी शहराच्या पाईपलाईनमधून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. मग गळतीही नगरसेवकांच्या घरात मुरत आहे आणि वारणाकाठच्या लोकांना वेठीस धरून आमच्या हक्काचे पाणी नेण्याचा प्रयत्न केल्यास शिरोळची जनता गप्प बसणार नसल्याचे आमदार उल्हास पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वारणाकाठावरून इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना इचलकरंजी शहराला वारणेचे पाणी कशासाठी पाहिजे. सध्याची मजरेवाडीतून असलेली कृष्णा योजनेची पाईपलाईन दुरुस्त करून घ्यावी. त्याचबरोबर पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करून इचलकरंजी शहराला पाणी घ्यावे. आता जर इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींनी जर कोथळीवर डोळा ठेवला असेल तर जनता गप्प बसणार नाही.
- संजय नांदणे, कोथळी