अंध-अपंग लाभार्थ्यांचे आंदोलन
By admin | Published: June 6, 2017 12:47 AM2017-06-06T00:47:30+5:302017-06-06T00:47:30+5:30
इचलकरंजी पालिकेसमोर ठिय्या : निधी वाटपावरून आंदोलनकर्ते व लेखापाल यांच्यात वाद
लोकमत न्यूज नेटवर्क --इचलकरंजी : शहरातील अंध-अपंगांसाठी राखीव असलेल्या निधीचे वाटप करावे, या मागणीसाठी सोमवारी नगरपालिकेवर काढलेल्या मोर्चातील आंदोलकांनी तासभर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी नगराध्यक्षा अलका स्वामी या सामोरे गेल्या असताना झालेल्या चर्चेवेळी निधीच्या रकमेतील फरकावरून आंदोलक भरमा कांबळे व लेखापाल राजेंद्र महींद्रकर यांच्यात वाद झाला. दरम्यान, उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे व मॅँचेस्टर आघाडीचे पक्षप्रतोद सागर चाळके यांनी मध्यस्थी केली. आज, मंगळवारी संयुक्त बैठक घेऊन निर्णय करण्याचे आश्वासन दिले.
अपंगांना नगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील तरतुदीप्रमाणे महसुली निधीच्या तीन टक्के निधीचे वाटप करावे, अशी मागणी वारंवार करूनसुद्धा पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. म्हणून सोमवारी अंध-अपंग कल्याण संघाच्यावतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. नगरपालिकेतील प्रवेशद्वारामध्ये आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. सुमारे अर्ध्या तासानंतर नगराध्यक्षा स्वामी या आंदोलनास सामोरे गेल्या. त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेले लेखापाल महींद्रकर यांनी माहिती देताना नगरपालिकेच्या अंदाजपत्रकातील महसुली निधीपैकी तीन टक्के म्हणजे १.७५ कोटी रुपये इतका निधी आरक्षित आहे, असे सांगितले. मात्र, राखीव निधीची रक्कम तीन कोटी रुपये असल्याबद्दल कल्याण संघाच्यावतीने भरमा कांबळे यांनी दावा केला. त्यावर महींद्रकर व कांबळे यांच्यात वाद निर्माण झाला. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी शंखध्वनी करीत जोरदार घोषणा दिल्या. सर्वजण उठून उभे राहिले. त्यामुळे गोंधळ उडाला आणि नगराध्यक्षा परत निघून गेल्या.
दरम्यान, उपनगराध्यक्ष मोरबाळे व मॅँचेस्टर आघाडीचे पक्षप्रतोद चाळके मोर्चासमोर गेले. त्यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अखेरीस आज, मंगळवारी संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
सव्वा कोटींचा फरक आणि गोंधळ
नगरपालिकेच्या असलेल्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये अंध-अपंगांसाठी तीन टक्के म्हणजे तीन कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद असल्याची माहिती संघटनेला यापूर्वी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली. सोमवारच्या अंध-अपंगांच्या आंदोलनावेळी माहिती सांगताना महसुली अंदाजपत्रकामध्ये हीच रक्कम १.७५ कोटी रुपये होत असल्याची माहिती लेखापाल राजेंद्र महींद्रकर यांनी दिली. त्यांच्या याच मुद्द्यावरून पालिकेवरील आंदोलनावेळी गोंधळ उडाला. मुख्याधिकारी व लेखापाल यांनी सांगितलेल्या आकडेवारीमध्ये सव्वा कोटी रुपये असलेला फरक हाच कळीचा मुद्दा ठरला, याची चर्चा आंदोलनकर्ते व नगरपालिकेमध्ये सोमवारी दिवसभर होती.
५इचलकरंजीत अंध-अपंग कल्याण संघाच्यावतीने नगरपालिकेवर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनावेळी कल्याण निधीबाबत वाद निर्माण झाल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे उडालेला गोंधळ.