सर्किट बेंचसाठी जनआंदोलनाचा रेटा
By admin | Published: August 19, 2016 11:46 PM2016-08-19T23:46:49+5:302016-08-20T00:12:58+5:30
कोल्हापूरकरांचा वज्रनिर्धार : वकिलांच्या उपोषणास सर्वपक्षीयांसह विविध संस्था, संघटनांचा पाठिंबा
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सहा जिल्ह्यांचे सर्किट बेंच होण्यासाठी शुक्रवारी कोल्हापूरकर पुन्हा एकदा सरसावले. न्यायसंकुलाच्या आवारात सुरू असलेल्या वकील बांधवांच्या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला आमदारांसह शहरातील विविध पक्ष, स्वयंसेवी संस्था, संघटना, पक्षकारांनी उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी ‘कोल्हापुरात सर्किट बेंच होणारच’ असा एकमुखी निर्धार करून सर्वांनी वज्रमूठ बांधली. दरम्यान, याच मागणीसाठी सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर जिल्ह्यांतील वकिलांनी ज्या-त्या ठिकाणी एकाचवेळी लाक्षणिक उपोषण केले.
सकाळी दहा वाजल्यांपासून खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक तथा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली. यावेळी बार असोसिएशनचे सेक्रेटरी अॅड. सर्जेराव खोत यांनी कोल्हापूरला सर्किट बेंच का गरजेचे आहे, किती वर्षांपासून हा लढा सुरू आहे, याविषयाची माहिती प्रास्ताविकात दिली. त्यानंतर उपस्थितांनी वकिलांनी ‘वुई वाँट मुंबई हायकोर्ट सर्किट बेंच अॅट कोल्हापूर’ अशा घोषणा दिल्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास छत्रपती शाहू महाराज यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
यावेळी छत्रपती शाहू महाराज म्हणाले, सर्किट बेंच होणे ही काळाची गरज आहे. पुन्हा एकदा शासनाला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन गरजेचे आहे. हे आंदोलन केवळ वकिलांचे न होता ते जनतेचे झाले पाहिजे, असे सांगितले. आमदार चंद्रदीप नरके यांनीही हे आंदोलन नुसते वकिलांचे असून चालणार नाही, तर सर्किट बेंचच्या लढ्यात खऱ्या अर्थाने जनतेने सहभागी झाले पाहिजे, असे सांगीतले. याप्रश्नी मी आज स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सायंकाळी फोनवरून चर्चा करणार आहे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज्यपाल विद्यासागर राव, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व खंडपीठ कृती समितीची संयुक्त बैठक होण्यासाठी प्रयत्न करेन. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत सहा जिल्ह्यांतील आमदारांची या प्रश्नी एकत्रित बैठक घेण्याची विनंती करू, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पक्षकार सुभाष दुर्गे यांनी, सर्किट बेंच होणे का गरजेचे आहे, याचे सविस्तर विवेचन केले. यावेळी सुभाष सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.
दुपारी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजू लाटकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव, प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे, शहराध्यक्ष महेश उरसाल, ‘मनसे’चे राजू जाधव, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने, दीपाताई पाटील, चंद्रकांत बराले, आदींनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
यावेळी खासदार धनंजय महाडिक , महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, सभागृह नेते प्रवीण केसरकर, राष्ट्रवादी गटनेते सुनील पाटील, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, सभापती वृषाली कदम, नगरसेविका दीपा मगदूम, शोभा कवाळेंसह सर्व नगरसेवक, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. अरुण पाटील, अॅड. अंशुमन कोरे,
अॅड. प्रशांत पाटील, अॅड. संदीप चौगुले, अॅड. मनोहर पोवार, अॅड. धैर्यशील पवार, अॅड. मिथुन भोसले, अॅड. गुरू हारगे, अॅड. यतिन कापडिया, अॅड. शहाजी पाटील, आदी उपस्थित होते. दुपारी चार वाजता सरबत देऊन उपोषणाची सांगता झाली. आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित होते.
सिटीझन फोरमची रॅली...
सर्किट बेंच झाले पाहिजे, या मागणीसाठी टाऊन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीपासून सिटीझन फोरमतर्फे दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. शिवाजी चौक, बिंदू चौक, अयोध्या टॉकीज, दसरा चौकमार्र्गे व्हीनस कॉर्नर, कावळा नाका, पितळी गणपती चौक येथून न्यायसंकुल येथे आली. या रॅलीत उदय लाड, जयदीप शेळके, वैभवराज भोसले, अशोक रामचंदानी, महेश पाठक, बाजीराव नाईक, राजन कामत, फिरोज शेख, गौरव लांडगे, सुरेश गायकवाड, आदींचा सहभाग होता.
निर्णय न झाल्यास सप्टेंबरमध्ये वकिलांची परिषद
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरातील सर्किट बेंचप्रश्नी पुढील १५ दिवसांत राज्य शासनाने निर्णय न घेतल्यास सप्टेंबरमध्ये सहा जिल्ह्यांतील वकिलांची परिषद कोल्हापुरात घेतली जाईल, असे खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक तथा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे यांनी शुक्रवारी सांगितले. अॅड. मोरे म्हणाले, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आठ-दहा दिवसांत याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संयुक्त बैठक घेऊ, असे आश्वासन दिले आहे; पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून भेटीचे प्रयत्न न झाल्यास हे आंदोलन तीव्र केले जाईल. आता आम्ही दारात बसून आंदोलन करणार नाही. विविध मार्गांचा अवलंब केला जाईल. त्यासाठी सप्टेंबरमध्ये सहा जिल्ह्यांतील वकिलांची परिषद घेऊन सर्किट बेंच प्रश्नाबाबत वकीलबांधव ठोस निर्णय घेणार आहोत व या परिषदेत पुढील दिशा ठरविली जाईल.
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, या मागणीसाठी शुक्रवारी कसबा बावड्यातील न्यायसंकुलाच्या आवारात वकिलांनी उपोषण केले. यावेळी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. प्रकाश मोरे यांनी मार्गदर्शन केले.