शिरोळच्या मांगगारुडी समाजाचे आंदोलन
By admin | Published: January 6, 2015 11:47 PM2015-01-06T23:47:04+5:302015-01-06T23:47:04+5:30
नागरी सुविधा द्या : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी
कोल्हापूर : नागरी सुविधांची दुरवस्था, साथीच्या आजारांकडे लक्ष वेधण्यासाठी शिरोळ येथील मांगगारुडी समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात महिलाही सहभागी झाल्या आहेत. आंदोलकांनी आज जोरदार निदर्शनेही केली.
शिरोळ येथील मांगगारुडी समाजातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून नागरी सुविधांपासून वंचित आहेत. त्यांच्या घराभोवतीच्या परिसरातील जागेत उकिरडे, खड्डे, काटेरी झुडपे, शौचालयाचे पाणी तसेच गटारीतील सांडपाणी यांमुळे दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्याचे पाणी साचून शेवाळ तयार झाले असून, त्यापासून डास व माश्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या सर्व कारणांनी मांगगारुडी समाजातील महिला, मुलांचे आरोग्य बिघडले आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या रोगांनी नागरिक त्रस्त आहेत. यासंदर्भात शिरोळ ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची सुरुवात केली असून, या अभियानाचा गाजावाजा जगभर होत आहे; पण शिरोळ ग्रामपंचायत मांगगारुडी समाजाच्या प्रश्नात लक्ष घालत नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि समाजातील नागरिकांना रोगराई व दुर्गंधीपासून वाचवावे, दुर्गंधी नाहीशी करण्याचे आदेश ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला द्यावेत, म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे धरण्यात आले आहेत. त्याचे नेतृत्व मांगगारुडी क्रांतिदल, शिरोळचे अध्यक्ष संजय चौगुले, जिल्हा संघटक सचिन सकट, अनिल लोंढे, विश्वास लोंढे, मुरलीधर लोंढे, वंदना लोंढे, विलास सकट, राजेश सकट, बाळाबाई सकट, समीर सकट, सुनील गायकवाड, चंद्रकला लोंढे, आदींनी केले.