पुजाऱ्यांविरोधात भक्तांचे आंदोलन
By admin | Published: June 19, 2017 12:51 AM2017-06-19T00:51:57+5:302017-06-19T00:51:57+5:30
अंबाबाईला साकडे : गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या पाचजणांना रोखले; जोरदार घोषणाबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईस घागरा-चोली नेसविण्याचा प्रकार व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अवमान यावरून मंदिरातील पुजाऱ्यांना हटवण्याच्या सर्वपक्षीय आंदोलनास रविवारी प्रारंभ झाला. ‘आई अंबाबाई..तुझा व राजर्षी शाहूराजांचा अवमान करणाऱ्या पुजाऱ्यांना मंदिरातून बाहेर काढ व त्यांना सुबुद्धी दे,’ असे साकडे घालत शेकडो सर्वपक्षीय भक्तांनी आंदोलन केले.
यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात सोवळे नेसून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘स्वाभिमान’च्या सचिन तोडकरसह पाचजणांना पोलिसांनी रोखले. आंदोलकांनी मंदिरात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अंबाबाईला गेल्या शुक्रवारी बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांनी पारंपरिक काठा-पदराची साडी न नेसविता भाविकाने दिलेले घागरा-चोली नेसविले. या वादाचे पर्यवसान शनिवारी जनप्रक्षोभात झाले. त्यात श्रीपूजकांनी मूर्तीच्या मूळ स्वरूपाशी छेडछाड आणि ‘तथाकथित’ भाषेत राजर्षी शाहू महाराजांच्या वटहुकुमाचाही अवमान केला. याविरोधात आंदोलन म्हणून कोल्हापुरातील सर्वपक्षीय संघटनांमधील भक्त रविवारी सकाळी दहा वाजता जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर एकत्रित आले. यावेळी महिला अग्रभागी होत्या. पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास सर्व भक्तांनी एकत्रितरीत्या मंदिरात जाऊन ‘आई, तुझा अवमान करणाऱ्या पुजाऱ्यांना बाहेर काढ व राजर्षी शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्यांना सुबुद्धी दे,’ असे म्हणत देवीपुढे साकडे घातले. यावेळी भक्तांकडून ‘ उदं गं आई उदं,’ ‘अंबामाता की जय,’ ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं,’ ‘राजर्षी शाहू महाराज की जय,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या दरम्यान परगावाहून आलेल्या भक्तांना पितळी उंबऱ्याच्या बाहेर थांबवून ठेवण्यात आल्याने त्यांना आंदोलन कसे आणि कशासाठी सुरू आहे, याची कल्पना नव्हती. त्यामुळे ते काहीकाळ देवीचे दर्शन मिळत नसल्याने हवालदिल झाले . मात्र, आंदोलनानंतर दर्शन सुरळीत झाल्याने या भाविकांना हायसे वाटले.
बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
‘साकडे’ आंदोलनानंतर अंबाबाई मंदिर परिसरातील सिद्धिविनायक मंदिराच्या ओवरीवर झालेल्या छोट्याशा बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना बुधवारी (दि. २१) रोजी दुपारी बारा वाजता सर्वपक्षीय संघटना, भक्त यांच्यातर्फे कारवाईबाबतचे निवेदन दिले जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिली.
---------
साने गुरुजींनी दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून आमरण उपोषण केले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाला तसा कायदा संमत करावा लागला. श्रीपूजकांच्या पत्नी, आई, मुलींना अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. त्याचप्रमाणे सर्व जातींच्या महिलांना मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश मिळावा, यासाठी लवकरच जनआंदोलन सुरू करण्याची गरज आहे. आई अंबाबाईच्या पूजेचा विधी करण्याचा अधिकारही महिलांना मिळावा.
- सुभाष देसाई, ज्येष्ठ पत्रकार