‘डवरी’ समाजाचे आंदोलन चिघळले
By admin | Published: February 13, 2015 01:04 AM2015-02-13T01:04:37+5:302015-02-13T01:07:19+5:30
अतिक्रमण काढण्यास विरोध : महिला, कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; तणावामुळे तहसीलदार माघारी फिरले
कोल्हापूर : येथील सायबर चौकालगत असलेल्या दौलतनगर-जागृतीनगर परिसरातील डवरी समाजाला दिलेल्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यास गेलेल्या करवीर तहसीलदारांसह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी एका वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागले. ‘अतिक्रमण काढायला पुढे याल तर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊ,’ असा इशारा देत सात ते आठ महिलांनी चक्क अंगावर रॉकेल ओतून घेतले. आत्मदहन करण्याचा महिलांचा प्रयत्न पाहून अतिक्रमण न काढताच अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला; परंतु या प्रकाराने संतप्त झालेल्या डवरी समाजातील काही व्यक्तींनी ‘अतिक्रमण काढणार नसाल तर आम्हीही शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करतो,’ असा इशारा दिला. या प्रकाराने जिल्हा प्रशासन व पोलीस यांची मात्र बरीच तारांबळ उडाली.
डवरी समाजाला दिलेल्या दोन एकर अठरा गुंठे जागेवर पूर्वीपासूनच काही लोक राहत आहेत. आता तर समाजासाठी केवळ अठरा गुंठेच जमीन शिल्लक राहिली आहे. या जागेतही सात कुटुंबांचे अतिक्रमण पूर्वीपासूनचे आहे. या सात कुटुंबांचे अतिक्रमण काढावे म्हणून डवरी समाजाची शंभरहून अधिक कुटुंबे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २ ते ६ फेब्रुवारीपर्यंत उपोषण आणि त्यानंतर आजअखेर धरणे धरून बसली आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी गुरुवारी अतिक्रमण काढले जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे हे महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक घेऊन तेथे गेले होते. त्यानुसार गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दौलतनगर परिसरातील डवरी समाजातील जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक गेले. या ठिकाणी अगोदरपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. कारवाईसाठी तीन ठाण्यांचे पोलिस निरीक्षक व करवीर तहसिलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे धडक कारवाईचा प्रशासनाचा प्रयत्न होता. परंतू हे पथक आल्याने डवरी समाजातील स्थानिक नागरिक जमा झाले. याच समाजातील कांहीनी अतिक्रमण काढण्यास जोरदार विरोध केला. बायकांचा प्रचंड आरडाओरड सुरु होता. तिथे जाण्यासाठी अरुंद बोळ असल्याने आतील बाजूस काय सुरु आहे हेच नेमके कांहीच समजत नव्हते. आंदोलक महिला असूनही त्यांना आवरण्यासाठी मात्र एकही महिला कॉन्स्टेबल नव्हत्या. अतिक्रमण काढण्यास पथक आल्याचे समजताच या समाजातील महिला एकत्रित झाल्या. त्यातील पाच-सहा महिलांनी अचानक रॉकेलचा कॅन काढून अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही पुढे आलात तर आम्ही आत्मदहन करू’ असा इशारा देत त्या सरसावल्या. आगपेटी पेटवली असती तर मोठा अनर्थ घडला असता. झोपडीसारखी घरे असल्याने आगीचा धोका होता. हा धोका व महिलांचा रुद्रावतार पाहून पोलिसांनी काढता पाय घेतला. तहसिलदार खरमाटेही गुपचूप निघून गेले.महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कांहीच आदेश नसल्याने ते थोडावेळ थांबून निघून गेले; पण जमाव त्या ठिकाणी थांबून होता. या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले. या परिसराच्या नगरसेविका संगीता देवेकर यांनी आत्मदहन करणाऱ्या महिलांकडून रॉकेलचे कॅन काढून घेतले. अतिक्रमण काढण्यास देवेकर यांनीही विरोध केला. त्यांनी नागरिकांशी चर्चा केली व शांत राहण्याचे आवाहन केले.
कार्यालयाची झाली वसाहत..
डवरी समाजातील दीडशेहून अधिक लोकांनी मुलाबांळासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडले. रस्त्याकडेलाच जेवण करतात. मुले रस्त्यावरच खेळतात. बॅरिकेटिंगवर कपडे सुकत आहेत. तेथे जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी डवरी वसाहतीतच आल्यासारखे वाटते. प्रशासनही न्यायप्रविष्ठ बाब असल्याचे सांगून पेचात सापडले.
मार्ग काढू : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी राजाराम माने म्हणाले, डवरी समाजाला जागा दिली, त्याच्यावर पूर्वीपासून काहीजणांनी अतिक्रमण केले आहे. त्यांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेऊनच निर्णय घेतला जाईल.
बैठकीत तोडगा नाही
सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, प्रांत प्रशांत पाटील, तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे, अभियंता संजीव देशपांडे, संघटनेचे नेते लक्ष्मण माने, बाजीराव नाईक यांची बैठक झाली. ज्या जागेवर अतिक्रमण झालेले नाही ती जागा आधी ताब्यात घ्या, असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले, पण ते मान्य केले नाही.
प्रकरण चिघळतंय, तोडगा आवश्यक
समाजाच्या जागेवरील अतिक्रमण अनेक वर्षांपासूनचे आहे. तरीही हा प्रश्न आताच का ऐरणीवर आला हा प्रश्न आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या राजकारणाचा या प्रकरणाला गंध आहे. त्यामुळे हा प्रश्न सामाजिक अशांतता निर्माण होईपर्यंत गप्प न बसता जिल्हा प्रशासनाने त्यात लक्ष घालणे आवश्यक आहे.
डवरी समाज संतप्त
अतिक्रमण केलेल्या कुटुंबातील महिलांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यामुळे कारवाई न करताच अधिकारी मागे फिरल्याची माहिती मिळताच इकडे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून बसलेल्या डवरी समाजात अस्वस्थता निर्माण झाली. त्यांनी तत्काळ निवासी उपजिल्हाधिकारी चव्हाण, तहसीलदार डॉ. खरमाटे यांची भेट घेऊन अतिक्रमण काढण्याचा शब्द दिला होता त्याचे काय झाले? अशी विचारणा केली.
आम्हीही आज आत्मदहन करणार
अधिकाऱ्यांना तेथून पिटाळले जाणार असेल तर आम्हीही शुक्रवारी सकाळी सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा बाजीराव नाईक यांनी दिला. नगरसेविका संगीता देवेकर यांच्यासह त्या महिलांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पाच कुटुंबांची
न्यायालयात धाव
ज्या सात कुटुंबांनी डवरी समाजाच्या जागेवर पूर्वीपासूनच अतिक्रमण केले आहे त्यांपैकी रोशनबी इलाई शेख, भगवान कलकुटगी, सुमन बाबूराव नलवडे, रामचंद्र नारायण माने व शंकर दौलू पाटील अशा पाचजणांनी न्यायालयात धाव घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून आपण राहत असलेल्या सरकारी जागेवरील आपले अतिक्रमण कायम करून द्यावे म्हणून मागणी केली आहे. यावर न्यायालयात सुनावणी सुरू असून, कारवाई करण्यास स्थगिती देण्यात आल्याचे तहसीलदार खरमाटे यांनी सांगितले. गुरुवारी हरी शामराव चिले व बाळकृ ष्ण पांडुरंग माने यांचे अतिक्रमण काढण्यास अधिकारी गेले होते.
डवरी समाजातील चार घरांची अज्ञातांकडून नासधूस
डवरी समाजातील अनेक कुटुंबीय आंदोलनाच्या ठिकाणी असल्याचे पाहून गरुवारी सायंकाळी अज्ञातांनी चार घरांत घुसून आतील साहित्यांची नासधूस केली. बनाबाई ईश्वर साळोखे, मालाबाई यशवंत माळी, रामा भिकू इंगवले, मालाबाई श्रीरंग शिंदे यांच्या घरात घुसून अज्ञातांनी ही नासधूस केली. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. पोलिसांना माहिती कळताच वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, असा प्रकार घडला नसून कोणी तरी बेबनाव केल्याचे नागरिकांनी पत्रकारांना सांगितले.