कोल्हापूर जिल्ह्यात मटका-जुगाराची चलती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:58 AM2018-11-15T10:58:16+5:302018-11-15T10:59:45+5:30
दिवाळीपासून जिल्ह्यात मटका व जुगार पुन्हा जोमात सुरू झाला आहे. मोबाईल, एसएमएस व व्हॉटस अॅपद्वारे आॅनलाईन मटका घेतला जात आहे. स्थानिक पोलीस ठाण्यातील निरीक्षकांसह गुन्हे शाखेच्या पथकाच्या पाठराखणीमुळे अवैध व्यावसायिकांची चलती सुरू असल्याचे भयावह चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर : दिवाळीपासून जिल्ह्यात मटका व जुगार पुन्हा जोमात सुरू झाला आहे. मोबाईल, एसएमएस व व्हॉटस अॅपद्वारे आॅनलाईन मटका घेतला जात आहे. स्थानिक पोलीस ठाण्यातील निरीक्षकांसह गुन्हे शाखेच्या पथकाच्या पाठराखणीमुळे अवैध व्यावसायिकांची चलती सुरू असल्याचे भयावह चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
पानटपरीमध्ये घेतला जाणारा मटका आता मोबाईलवर घेतला जात आहे. आॅनलाईनद्वारेही मटक्याची आर्थिक उलाढाल कोटींच्यावर होते. दिवाळीपासून हा अवैध व्यवसाय पुन्हा जोर धरू लागला आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी क्राईम बैठक घेऊन, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी व अवैध धंद्यांची माहिती घेतली.
यावेळी अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी निरीक्षकांना दिले होते. काही विशिष्ट बुकी मालकांवर कारवाई करण्याचे धाडस पोलीस निरीक्षकांकडून झालेले नाही.
जिल्ह्यात इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले, पेठवडगाव, पन्हाळा, शाहूवाडी, सांगरूळ, बाजारभोगाव, कळे, कागल, गारगोटी, चंदगड, राधानगरी, हुपरी, आदींसह कोल्हापूर शहरातील शुक्रवार पेठ, तोरस्कर चौक, गंगावेश, ऋणमुक्तेश्वर मंदिर, दुधाळी, रंकाळा स्टॅन्ड, मिरजकर तिकटी, वांगी बोळ, शिवाजी चौक, महाद्वार रोड, संभाजीनगर, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, बागल चौक, सायबर चौक, विचारेमाळ, सदर बाजार, कावळा नाका, कदमवाडी, कसबा बावडा, आदी परिसरातील गल्ली-बोळांत खुलेआम मटका, जुगारअड्डे सुरू आहेत.
पिवळ्या-पांढऱ्या चिठ्ठ्या बंद करून मोबाईल, एसएमएस व व्हॉटस अॅपवरून मटका घेण्याची नवी पद्धत मटका धारकांनी अवलंबली आहे.
मस्टर भरण्यासाठी कारवाई
गुन्ह्यांचे मस्टर भरण्यासाठी आपापल्या हद्दीतील किरकोळ मटका व जुगार अड्ड्यांवर छापे टाकून आपला प्रामाणिकपणा दाखविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. मटका-जुगार सुरू असताना जिल्ह्यात कोठेही मटका किंवा जुगार सुरू नसल्याची वल्गना आजही काही पोलीस करीत आहेत. जिल्ह्यातील ३२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राजरोस मटका सुरू असल्याचे दिसून येत आहे.
जुगाराचा बाजार
सोमवार ते शनिवार मटका जोमात असतो. रविवार या एका दिवशी मटक्याला सुट्टी असल्याने या दिवशी तीनपानी जुगाराचा जिल्ह्यात बाजार भरलेला असतो. या दिवशी जुगारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. जुगार खेळण्यामध्ये काही राजकीय पुढाºयांचा मोठा सहभाग आहे. शहरातील काही नगरसेवक शाहूवाडी किंवा पन्हाळा येथील हॉटेलवर जुगार खेळण्यासाठी दर आठवड्याला जात असल्याची चर्चा आहे.