कामगारांच्या आंदोलनाने वस्त्रनगरीची आर्थिक घडी विस्कटली, दररोज २५ कोटींहून अधिक कापड उत्पादन ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:55 PM2018-01-04T12:55:03+5:302018-01-04T12:59:08+5:30
इचलकरंजी येथील यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस असून, दररोज २५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे कापड उत्पादन ठप्प झाले आहे. आंदोलन आणखीन चार दिवस लांबल्यास शहर व परिसरातील यंत्रमाग कारखाने पूर्णपणे बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. ज्यामुळे वस्त्रनगरीची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली जाण्याची शक्यता असतानाही आजी-माजी लोकप्रतिनिधी, तसेच यंत्रमाग कारखानदारांच्या संघटना मात्र मूग गिळून गप्प असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
राजाराम पाटील
इचलकरंजी : येथील यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस असून, दररोज २५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे कापड उत्पादन ठप्प झाले आहे. आंदोलन आणखीन चार दिवस लांबल्यास शहर व परिसरातील यंत्रमाग कारखाने पूर्णपणे बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. ज्यामुळे वस्त्रनगरीची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली जाण्याची शक्यता असतानाही आजी-माजी लोकप्रतिनिधी, तसेच यंत्रमाग कारखानदारांच्या संघटना मात्र मूग गिळून गप्प असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
यंत्रमाग कामगारांना महागाई निर्देशांकाच्या फरकावर आधारीत दरवर्षी मिळणारी मजुरीवाढ गतवर्षी मिळाली नाही. त्यासाठी नोटाबंदी व जीएसटी असे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. वाढीव मजुरी व गतवर्षीच्या मजुरीतील फरक मिळावा, या मागणीसाठी सर्व कामगार संघटनांनी १ जानेवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ८० टक्के यंत्रमाग बंद पडल्याचा दावा कामगार संघटनांनी केला. आता याचे लोण आसपासच्या ग्रामीण परिसरात पसरत असल्याचे त्यांनी सांगितले. साठ टक्के यंत्रमाग बंद पडल्याची कबुली यंत्रमागधारक संघटनांनी दिली. त्यामुळे शहरातील कापड उत्पादनामध्ये साठ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.
कामगारांच्या मागण्यांसाठी थोरात चौकात दररोज कामगारांची सभा होते. त्याचा परिणाम म्हणून कारखाने बंद पडण्याचे लोण आता पसरत चालले आहे. नजीकच्या तीन-चार दिवसांत मजुरीवाढीबाबत हालचाली होवून योग्य असा तोडगा निघाला नाही तर यंत्रमाग कारखाने पूर्णपणे बंद पडण्याची भीती जाणकार यंत्रमाग कारखानदारांकडून व्यक्त होत आहे.
अशा स्थितीमध्ये आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, त्याचबरोबर यंत्रमाग कारखानदारांच्या संघटनांनी पुढाकार घेवून काम बंद आंदोलन संपुष्टात आणण्याची गरज असताना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची हालचाल होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
खर्चीवाले यंत्रमागधारकांना वाली कोण?
शहर व परिसरात जॉब वर्क पद्धतीने कापड उत्पादन करणाऱ्या खर्चीवाले यंत्रमागधारकांची संख्या लक्षणीय आहे. साधारणत: वीस हजारांहून अधिक यंत्रमाग असलेल्या या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीचा प्रश्न गेले वर्षभर प्रलंबित आहे.
गतवर्षी मार्च महिन्यामध्ये खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरीवाढ देण्याकरीता प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये कापड व्यापाऱ्यांनी कमीत कमी प्रतिपीक प्रतीमीटर सहा पैसे मजुरी द्यावी, असा निर्णय लवाद समितीने घेतला होता. मात्र, या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.
याच बैठकीमध्ये, आता खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढप्रश्नी लवाद समितीच्या बैठका होणार नाहीत, असे जाहीर करण्यात आल्यामुळे जॉब वर्क करणा यंत्रमागधारकांच्या या घटकास कोणीच वाली राहिला नाही, अशी स्थिती झाली आहे. आता कामगारांच्या मजुरीवाढीबरोबर खर्चीवाले यंत्रमागधारकांची मजुरीसुद्धा निश्चित करावी, या मागणीला जोर धरू लागला आहे.