मल्टिस्टेटसाठी ‘गोकुळ’च्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:48 AM2018-05-14T00:48:08+5:302018-05-14T00:48:08+5:30

Movement of 'Gokul' for multitet | मल्टिस्टेटसाठी ‘गोकुळ’च्या हालचाली

मल्टिस्टेटसाठी ‘गोकुळ’च्या हालचाली

Next

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सध्या सीमाभागातून दूध संकलन केले जाते, आगामी काळात वीस लाख लिटरचा टप्पा गाठायचा झाल्यास शेजारील राज्ये महत्त्वाची आहेत. त्यादृष्टीने हालचाली गतिमान झाल्या असल्या तरी ‘गोकुळ’च्या कारभारात राज्य सरकारचा वाढता हस्तक्षेप थांबविण्यासाठीच हे पाऊल उचलल्याची चर्चा सहकारात आहे.
दुधाची मागणी व उपलब्धतेचे प्रमाण समान होते, त्यावेळी फारशी दुधाची टंचाई भासली नाही. आता म्हैस दुधाची मागणी वाढत आहे. म्हैस दुधाला वाढत जाणाऱ्या मागणीमुळे ‘गोकुळ’ने सीमाभागात दूध संकलन सुरू केले. कोल्हापूर जिल्ह्यातील दुभते पशुधन व उत्पादकता वाढीसाठी संघ गेले अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. त्यामुळे दूध वाढले असले तरी ‘कोल्हापुरी’ दुधाच्या गोडीमुळे मागणी वाढतच जात आहे. त्यासाठी ‘गोकुळ’ला सीमाभागासह कोकणात जावे लागत आहे; पण कायद्याने थेट तिथे जाऊन प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून संकलन करता येत नाही. यासाठी एजंटांंच्या माध्यमातून दूध घ्यावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. हे जरी मुख्य कारण असले तरी राज्य सरकारचा कमालीचा हस्तक्षेप दूध व्यवसायात वाढला आहे. संघांना विश्वासात न घेता म्हैस व गाय दूध खरेदी दरात केलेल्या वाढीने संघांची डोकेदुखी वाढली आहे. न्यायालयात जाऊन निर्णयाला स्थगिती मिळवली तरीही संचालक मंडळावर कारवाई का करू नये? अशा नोटीसा काढल्याने उत्पादकांमध्ये व्यवस्थापनाविरोधात मत तयार होत असल्याने संचालकांमध्ये अस्वस्थता आहे. राज्य सरकारचा हस्तक्षेप टाळून त्यांच्या अंकुशातून बाहेर पडण्यासाठी ‘गोकुळ’चे प्रयत्न सुरू आहेत.
मल्टिस्टेट केला तर राज्य सरकारचा संबंधच राहत नाही. केंद्र सरकारच्या अंतर्गत संघ आला तरी संपूर्ण देशासाठी एकच निबंधक असतो. त्यामुळे केंद्र सरकारचा फारसा हस्तक्षेप राहत नाही.
कारवाई गोकुळवर कशी ?
आदेशाप्रमाणे दूध खरेदी दरात वाढ न केल्याने राज्य सरकारने ‘गोकुळ’च्या संचालक पद रद्दबाबत नोटिसा काढल्या आहेत. ‘गोकुळ’ संस्थांकडून दूध खरेदी करते. शासनाचा आदेश पाळण्याचे कर्तव्य संस्थांचे आहे, त्यामुळे आमच्यावर कारवाई कशी? अशी चर्चा ‘गोकुळ’ वर्तुळात सुरू आहे.
गोकुळचे तुलनात्मक दूध संकलन लिटरमध्ये
वर्ष म्हैस गाय एकूण
एप्रिल-मे ५ लाख ५ लाख १० लाख
२०१७ ३८ हजार ५९ हजार ९७ हजार
एप्रिल-मे ६ लाख ६ लाख १२ लाख
२०१८ १३ हजार ३१ हजार ४४ हजार

Web Title: Movement of 'Gokul' for multitet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.