‘कोल्हापूर दक्षिण’मधील खराब रस्ते नव्याने न केल्यास आंदोलन : शिवसेनेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 11:56 AM2019-11-23T11:56:58+5:302019-11-23T11:58:37+5:30
कोल्हापूर : अतिवृष्टी व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ३६ गावांतील रस्ते खराब झाले आहेत; त्यामुळे जे ...
कोल्हापूर : अतिवृष्टी व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ३६ गावांतील रस्ते खराब झाले आहेत; त्यामुळे जे रस्ते मुदतपूर्व खराब झाले आहेत, ते संबंधित कंत्राटदाराकडून पुन्हा नव्याने लवकरात लवकर करावेत. तसेच जिथे गरज आहे, तिथे तत्काळ पॅचवर्क करावे. ही कामे आठवड्याभरात न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांना शुक्रवारी निवेदनाद्वारे देण्यात आला.
ताराबाई पार्क येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात दुपारी साडेबाराच्या सुमारास करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट दिली. या ठिकाणी कार्यकारी अभियंता सोनवणे व उपअभियंता धनंजय भोसले यांना निवेदन सादर करून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ३६ गावांतील खराब रस्त्यांबाबत विचारणा केली. या गावांमधील रस्त्यांची पाहणी करून जे रस्ते मुदतपूर्व खराब झाले आहेत किंवा जेथे पॅचवर्क करणे शक्य आहे, अशा रस्त्यांची यादी करावी. मुदतपूर्व खराब झालेले रस्ते संबंधित कंत्राटदाराकडून नव्याने लवकरात लवकर करून घ्यावेत. तसेच त्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. ज्या ठिकाणी पॅचवर्क करणे शक्य आहे, तिथे तत्काळ पॅचवर्क करावे.
संबंधित कंत्राटदाराने कोणता रस्ता केला, त्याची मुदत किती होती व मुदतपूर्व खराब झाला असेल तर तुमच्या कार्यालयाकडून त्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याचा सविस्तर तपशील लेखी स्वरूपात मिळावा. या मागण्यांबाबत सात दिवसांत लेखी उत्तर मिळावे; अन्यथा आपल्याविरोधात न्यायालयात दाद मागू, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
खराब रस्त्यांची ३० नोव्हेंबरपर्यंत डागडुजी केली जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी दिले. शिष्टमंडळात विनोद खोत, अवधूत साळोखे, रणजित कोंडेकर, अरुण अब्दागिरी, सरदार तिप्पे, शहाजी भोपळे, कैलास ढोबळे, शांताराम पाटील, प्रमोद भोसले, आदींचा समावेश होता.