सलग बाराव्या दिवशीही आंदोलकांचा ठिय्या
By admin | Published: December 24, 2016 11:52 PM2016-12-24T23:52:40+5:302016-12-24T23:52:40+5:30
तिलारी प्रकल्पग्रस्त : गोव्याचा पाणीपुरवठा बंदच
दोडामार्ग : एकरकमी अनुदानाची रक्कम करकपात न करता मिळावी यासाठी तिलारी धरणग्रस्तांनी कालव्यातच सुरू केलेले ठिय्या आंदोलन शनिवारी बाराव्या दिवशी सुरूच होते. प्रशासन जोपर्यंत आमची मागणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने गोव्याला पाणी सोडण्याबाबत प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
तिलारी प्रकल्पग्रस्तांना एकरकमी अनुदान म्हणून देय असलेली पाच लाख रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात करकपात करून जमा केली जात असल्याने प्रकल्पग्रस्तांनी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली करकपातीला विरोध दर्शविण्यासाठी कालव्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मात्र, प्रशासनाने त्यावर अद्याप तोडगा न काढल्याने सतत बारा दिवस हे आंदोलन सुरू आहे. शासन देत असलेली रक्कम आमच्या हक्काची आहे. त्यापाठीमागे त्याग आहे त्यामुळे ती देताना करकपात करू नये, अशी आंदोलकांची मागणी आहे; परंतु त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामत: गोव्याचे पाणी बंद आहे. धरणग्रस्त आपल्या मागणीवर ठाम असल्याने गोव्याला पाणी सोडणार कसे, असा प्रश्न तिलारीच्या अधिकाऱ्यांसमोर आहे.
पाणीप्रश्न होणार गंभीर
तिलारी प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन कालव्यांमधून गोव्यातील पेडणे, डिचोली या भागात पाणीपुरवठा केला जातो. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच या दोन्ही कालव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने पाणीपुरवठा बंद होता. हे काम १३ तारखेच्या आसपास पूर्ण झाले. मात्र, १३ पासूनच कालव्याच्या पात्रात प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरू केल्यामुळे पाणीपुरवठा बंदच आहे. त्यामुळे गोव्याकडे जाणारे पाणी साधारणपणे २५ दिवस बंद असल्याने गोव्यात पाणीप्रश्न गंभीर होणार आहे.