जुना बुधवार पेठ येथील वृक्षाचे पुनर्लागवड करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:22 AM2019-12-31T11:22:53+5:302019-12-31T11:28:21+5:30
जुना बुधवार पेठ येथे पोलीस निवासस्थानाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी असणारी वृक्ष तोडण्यास परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. असे असतानाही महापालिकेने येथील वृक्षाचे पुनर्लागवड करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वृक्षावर हरकती दाखल करण्यासंदर्भात नोटीस लावली आहे.
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथे पोलीस निवासस्थानाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी असणारी वृक्ष तोडण्यास परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. असे असतानाही महापालिकेने येथील वृक्षाचे पुनर्लागवड करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वृक्षावर हरकती दाखल करण्यासंदर्भात नोटीस लावली आहे.
विशेष म्हणजे २३ तारखेची नोटीस २८ डिसेंबरला वृक्षावर लावण्यात आली असून, सात दिवसांत हरकती दाखल करण्याचे यामध्ये म्हटले आहे. कोणी हरकती दाखल करू नये; यासाठी प्रशासनाने असा प्रकार केल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
जुना बुधवार पेठ येथील पोलिसांसाठी घरे बांधण्याचा प्रकल्प सुरू आहे. बांधकामाला अडथळा ठरत असल्यावरून ८0 वर्षांपूर्वीची दोन अशोकाची वृक्ष तोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. परिसरातील नागरिकांनी यासाठी दोन वेळ आंदोलन केले. गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर या बांधकामाला स्थगिती दिली; परंतु बांधकामासाठी वृक्षाभोवतीने खुदाई केली आहे.
यामुळे वृक्ष कमकुवत झाले असून, एका बाजूला झुकले आहेत. एकीकडे ही स्थिती असताना महापालिकेच्या उद्यान विभागाने वृक्षावर नोटीस लावली आहे. यामध्ये वृक्ष पूनर्लागवड करण्यात येणार असून, यासंदर्भात हरकती देण्याचे म्हटले आहे. मुळात संबंधित वृक्ष तोडूच नयेत, अशी मागणी नागरिकांची आहे. वृक्ष सोडून बांधकामास भरपूर जागा आहे. वृक्ष तोडलेच पाहिजेत, असे नाही. तसेच इतक्या मोठ्या वृक्षांची पूनर्लागवड करण्याची यंत्रणा महापालिकेकडे आहे काय? असा सवाल केला जात आहे.
परिसर पत्र्याने बंद, नागरिक नोटीस कशी पाहणार
वृक्षाचा संपूर्ण परिसर पत्र्याने बंद केला आहे. जेथून आत जावयाचे त्या दरवाजाला कुलूप असून, कोणालाही येथे प्रवेश करता येणार नाही, असा फलक लावला आहे. आतच जाता आले नाही, तर नागरिक नोटीस कशी पाहणार आणि हरकत कशी देणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
सात वृक्षांपैकी पाच वृक्षांची या परिसरातच पुनर्लागवड करण्यात येणार आहे. मुळांची आणि फांद्यांची छाटणी केली जाणार आहे. अशा प्रकारे कोटीतीर्थ येथे ५0 फुटांचे वृक्षाचे महापालिकेने पुनर्लागवड केली आहे. तसेच नोटीस २८ नव्हे तर २३ रोजीच लावली आहे.
अनिकेत जाधव,
उद्यान अधीक्षक