समित्या निवडीसाठी हालचाली

By admin | Published: December 31, 2015 12:38 AM2015-12-31T00:38:46+5:302015-12-31T00:42:22+5:30

महापालिकेतील हालचाली : ‘स्वीकृत’साठी नेत्यांकडे इच्छुकांची मोठी संख्या

Movement for selection of committees | समित्या निवडीसाठी हालचाली

समित्या निवडीसाठी हालचाली

Next

कोल्हापूर : महानगरपालिकेत आता स्थायी समितीसह परिवहन, महिला व बालकल्याण समिती तसेच स्वीकृत सदस्य निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता आज, गुरुवारी संपत असल्याने त्यानंतर आता या निवडीच्या घडामोडींना वेग येणार आहे. स्वीकृत सदस्य होण्यासाठी पाच जागांसाठी प्रथम ‘कारभारीं’ना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत प्रवेश देण्यासाठी आघाडीच्या नेत्यांची धडपड सुरू आहे. त्यानंतरच इतर निवडीसाठी हालचाली होत आहेत.
महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडी झाल्या; पण आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत.
महापालिकेतील आपल्या आघाडीच्या घडामोडीसाठी नेत्यांना ‘कारभारीं’ना स्वीकृत म्हणून महापालिकेत प्रवेश द्यायचा आहे. त्यासाठी प्रत्येक आघाडीच्या वतीने इच्छुकांची संख्या मोठी आहे. या स्वीकृत सदस्यपदासाठी काँग्रेसच्या वाट्याला दोन, राष्ट्रवादी, भाजप व ताराराणी आघाडींना प्रत्येकी एक जागा वाट्याला आली आहे.
याशिवाय पोटसमित्यांपैकी स्थायी समितीमध्येही वर्णी लागण्यासाठी आघाड्यांत इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या स्थायी समितीवर सदस्य निवडीसाठी अद्याप निश्चित झाले नसतानाही स्थायी समितीच्या सभापतिपदासाठीही हालचाली सुरू झाल्या आहेत.
आघाडी नेत्यांकडे अनेकांनी स्थायी समिती सभापतिपदासाठी साकडे घातले आहे. या सभापती निवडीमध्ये शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे; कारण महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आले; तर त्यानंतरच्या महापौर निवडणुकीत या सेनेच्या चार नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात राहिली. त्यामुळे सभापतिपदासाठी शिवसेनेच्या चार नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

वर्णी कोणाची : ‘स्थायी’साठीच्या जागा
स्थायी समितीसाठी वाट्याला आलेल्या जागा (एकूण १६ जागा)
काँग्रेस - ५, राष्ट्रवादी- ३, भाजप - ३, ताराराणी - ४, शिवसेना - १.
परिवहन समिती (एकूण १२ जागा) : काँग्रेस - ४, राष्ट्रवादी- २, भाजप - २, ताराराणी आघाडी - ३, शिवसेना - १.
महिला व बालकल्याण समिती (एकूण ९ जागा) : काँग्रेस - ३, राष्ट्रवादी - २, भाजप - २, ताराराणी आघाडी - २, शिवसेना - ०.

Web Title: Movement for selection of committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.