कन्नड सक्तीविरोधात कोल्हापूरात शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 06:42 PM2017-10-24T18:42:29+5:302017-10-24T18:46:40+5:30
कन्नडी शासनकर्त्यांनी कर्नाटक शाळेमधून कन्नड भाषेची सक्ती केल्याचे पडसाद मंगळवारी कोल्हापूरात उमटले. शिवसेनेच्यावतीने मिरजकर तिकटी चौकात निदर्शने करुन कन्नड भाषेच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
कोल्हापूर , दि. २४ : कन्नडी शासनकर्त्यांनी कर्नाटक शाळेमधून कन्नड भाषेची सक्ती केल्याचे पडसाद मंगळवारी कोल्हापूरात उमटले. शिवसेनेच्यावतीने मिरजकर तिकटी चौकात निदर्शने करुन कन्नड भाषेच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हयातील कन्नड भाषेमधील असणारे फलक संबधित खात्याच्या अधिकाऱ्यानी दहा दिवसात उतरुन घ्यावेत, अन्यथा शिवसैनिक आपल्या स्टाईलने उतरतील, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यावेळी दिला.
कर्नाटक सरकारने कर्नाटक शाळेमधून कन्नड भाषेची सक्ती केली आहे. स्वत:च्या राजकिय पोळी भाजण्यासाठी कन्नडींग शासनकर्त्यांनी कुटील कारस्थान रचले आहे.
या कन्नडीगांनी कन्नड भाषेतूनच सक्तीचे शालेय शिक्षण घेण्याचा निर्णयाचे परिपत्रक लादून हिंदूस्थानच्या राज्यघटनेने विद्यार्थ्यांना भाषा निवडीच्या दिलेल्या मूलभूत अधिकाराचा भंग करुन सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यावंर अन्याय केला आहे.
या भाषेसक्तीच्या परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक भाषा निवडण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होऊन परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यामुळे कर्नाटकातील दिल्ली बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळामधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक पदवी शिक्षणाच्या बाबतीत मागे राहून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
या सर्व गंभीर बाबींचा विचार करुन केंद्र शासनाने कन्नड भाषेमधून शिक्षण घेण्याची सक्ती रद्द करण्याचे आदेश कर्नाटक राज्यसरकारला द्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. तसेच ‘नाली काली कन्नडा ’, ‘काली नाली कन्नडा’ ही पाठ्य पुस्तके रद्द करुन शाळेतून कन्नड भाषा सक्तीचा घातलेला हा घाट अंमलात येऊ नये.
निदर्शनात जिल्हाप्रमुख विजय देवणे, रवी चौगले, अवधूत साळोखे, दत्ता टिपुगडे, शशिकांत बिडकर, प्रा. शिवाजीराव पाटील, राजेंद्र पाटील,दिलीप जाधव,दिलीप देसाई,राजू यादव,विनोद खोत,दिनेश परमार,चंदू भोसले,शुभांगी पोवार,दीपाली शिंदे, सुनीता निकम,मेघा पेडणेकर, अमित कांबळे आदींचा सहभाग होता.