तलाठी, मंडल अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरूच
By admin | Published: November 18, 2016 12:34 AM2016-11-18T00:34:28+5:302016-11-18T00:35:43+5:30
दुसऱ्या दिवशीही हेलपाटे : दाखले, सात-बारा बंदमुळे नागरिकांचे हाल
कोल्हापूर : सात-बारा संगणकीकरण व ई-फेरफारमधील अडचणी (सॉफ्टवेअर दुरुस्ती, सर्व्हर स्पीड, नेट कनेक्टिव्हिटी, आदी) दूर कराव्यात, तलाठी सज्जांची व महसूल मंडळाची पुनर्रचना करावी, यांसह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांचे सामुदायिक रजा आंदोलन गुरुवारीही सुरू राहिले.
यामुळे दाखले व सात-बारा उतारे यांसह विविध कामांसाठी तलाठी कार्यालयात आलेल्या नागरिकांचे हेलपाटे झाले. मागण्यांबाबत राज्य सरकारने दखल न घेतल्याने ते सुरूच राहणार आहे. त्यामुळे येथून पुढेही अडचणींना सामोरे जावे लागणार.
जिल्ह्यातील सर्व म्हणजे ४६३ तलाठी व ११४ मंडल अधिकारी हे या आंदोलनात सहभागी असल्याने सर्व तलाठी कार्यालये व तहसील कार्यालयातील तलाठी कार्यालये ओस पडली आहेत. या कार्यालयातून मिळणारे दाखले, सात-बारा उतारे त्याचबरोबर शासकीय वसुलीसह इतर कामे, असे काम या आंदोलनामुळे दुसऱ्या दिवशीही होऊ शकले नाही. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचा हेलपाटा होऊन त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास तलाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एकत्रित जमा झाले. यावेळी सरकारकडून काही चर्चा होते का, तसेच राज्य संघटनेकडून काही सूचना येतात का? याची दुपारपर्यंत वाट पाहिली; परंतु या आंदोलनाची दखल न घेता कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दुपारनंतर सर्व तलाठी व मंडल अधिकारी निघून गेले. करवीर तालुक्यातील सर्व तलाठी व मंडल अधिकारी मिरजकर तिकटी येथील महसूल भवन येथे एकत्र आले होते.
‘बीडीआें’कडे : ग्रा.पं.च्या किल्ल्या, शिक्के जमा
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ या संघटनेच्या सभासद ग्रामसेवकांनी ‘काम बंद’ पुकारून करवीर तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या किल्ल्या व शिक्के गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. ग्रामसेवकांनी मागण्यांसाठी ७ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे.
कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षे सेवा नियमित करणे, सोलापूर जिल्ह्यातील २३९ ग्रामसेवकांवरील चुकीची कारवाई रद्द करणे, दरमहा तीन हजार प्रवासभत्ता देणे, शैक्षणिक अर्हता बदलणे, ग्रामसभांची संख्या कमी करणे, यासारख्या १४ मागण्यांसाठी गेले दहा दिवस हे आंदोलन सुरू आहे.
याच आंदोलनाचा एक भाग म्हणून युनियनच्या करवीर शाखेने तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या किल्ल्या आणि शिक्के गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
पदाधिकाऱ्यांकडून तालुक्यांना भेटी
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य तलाठी व पटवारी संघटनेचे राज्य निमंत्रक शिवकुमार पाटील, पुणे विभागीय अध्यक्ष व्ही. बी. काळे व कोल्हापूर जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष वाय. आर. पाटील यांनी गुरुवारी तालुक्यांमध्ये तलाठी व मंडल अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.
राधानगरीत नागरिकांच्या अडचणीत आणखी भर
राधानगरी : तलाठी-मंडल अधिकाऱ्यांच्या सामूहिक रजा आंदोलनापाठोपाठ ग्रामसेवकांच्याही एका संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. गुरुवारी त्यांनी कार्यालये बंद करून चाव्या पंचायत समितीत जमा केल्या. यामुळे दाखले, उतारे मिळणे बंद झाले आहे. पैशांअभावी व्यवहारही ठप्प आहेत.
तलाठी आंदोलनाचे राज्यभर टप्पे
तलाठ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू आहे. पहिल्या टप्प्यात तलाठ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. दुसऱ्या टप्प्यात तहसील कार्यालयासमोर धरणे, त्यानंतर डिजिटल सह्यांची प्रणाली तहसीलदारांकडे सुपूर्द केली. तर बुधवारपासून बेमुदत रजा आंदोलन सुरू आहे.
शिरोळ : महाराष्ट्र राज्य तलाठी, मंडल अधिकारी संघटनेने बेमुदत पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा तलाठी संघटनेच्यावतीने जिल्हा पदाधिकाऱ्यांनी शिरोळ तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकारी यांची भेट घेऊन आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली.
ग्रामसेवक संघाचे भुसे यांना निवेदन
बांबवडे : ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांनी सुरू केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनात राज्य ग्रामसेवक संघ सहभागी झाला नसून, त्यांचे काम गुरुवारीही सुरळीत सुरू होते. दरम्यान, मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तारीख व वेळ ठरवून मिळावी, अशी मागणी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे संघाने केली.