परिचारकांवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन : शिवाजीराव परुळेकर
By admin | Published: March 11, 2017 03:32 PM2017-03-11T15:32:38+5:302017-03-11T15:32:38+5:30
एक लाख पोस्टकार्डे मुख्यमंत्र्यांना पाठविणार
परिचारकांवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल होईपर्यंत
आंदोलन : शिवाजीराव परुळेकर
कोल्हापूर : पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल होईपर्यंत माजी सैनिकांचे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.
परुळेकर म्हणाले, प्रशांत परिचारकांनी सैनिकांबद्दल केलेले बेताल वक्तव्य हे विकृत मानसिकतेचे प्रतिक आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होउन त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. भविष्यात ते अधिक तीव्र केले जाईल. परिचारकांनी ही घटना घडल्याचे स्वत: मान्य करुनही या घटनेची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय समिती नेमून केवळ दीड वर्षासाठी निलंबन करणे म्हणजे सरकारचा वेळकाढूपणा आहे. त्यामुळे परिचारकांची आमदारकी त्वरीत रद्द करावी. त्यांच्या सर्व शासकीय सुविधा, मानधन, भत्ते, कमिट्यांवरील पद रद्द करावे, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून मागण्यांची एक लाख पोस्टकार्डे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सोलापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांना पाठविली जाणार आहेत.