आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:55 AM2018-08-08T00:55:09+5:302018-08-08T00:55:14+5:30
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी आश्वासन दिले आहे. मात्र, त्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा शाहू छत्रपती यांनी मंगळवारी दिला.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात उद्या, गुरुवारी होणाऱ्या ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलक व पोलीस अधिकारी यांची बैठक बोलावलेली होती. त्याप्रसंगी शाहू छत्रपती बोलत होते. हा बंद कोल्हापूरच्या जनतेने अत्यंत शांततेत व सामान्य लोकांना कोणताही त्रास होणार नाही या पद्धतीने पार पाडावा, असे आवाहन सकल मराठा समाज व जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
शाहू छत्रपती म्हणाले, उद्याचा बंद शांततेत होईल, असा विश्वास आहे. सर्वांच्या सहकार्याने हे आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय नोकरभरती करणार नाही, यासह अन्य मागण्यांबाबतही सकारात्मक आश्वासन दिले आहे. मात्र, त्यांच्या बोलण्यावर समाजातील लोकांचा विश्वास नाही. शासनाने आंदोलनाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत
नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, तमिळनाडूच्या धर्तीवर परिशिष्ट ९ प्रमाणे महाराष्ट्रातही मराठा समाजाला आरक्षण देता येईल. त्याला न्यायालयात आव्हान देता येत नाही. शासनाने ते त्वरित द्यावे.
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले, आंदोलनास सर्व बाजूंनी पाठिंबा आहे. काही समाजकंटक घुसणार असतील तर त्यांची माहिती व सूचना आम्हालाही द्या. मराठा बांधवाने आजपर्यंत लाखोंचे मोर्चे शांततेत काढले
आहेत. गुरुवारचा बंदही शांततेतच होईल.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसलेल्यांवर आमचा विश्वास नाही. चार वर्षांपूर्वी त्यांनीच आरक्षणाचे गाजर दाखविले; पण पदरी फसवणूकच पडली. आझाद मैदानातील मोर्चात तर ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. शांततेत आंदोलन करणाºया आंदोलकांवर पोलीस गंभीर गुन्हे दाखल करीत आहेत. आंदोलन शांततेत सुरू असताना पोलीस जबरदस्ती का करत आहेत? जितके मराठ्यांना दाबाल, तितके ते उसळतील. मागासवर्ग आयोगाकडून नकारात्मक अहवाल आल्यास शासन काय करणार, असा सवालही त्यांनी उठविला.
यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे , दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, अनिल घाटगे, सचिन तोडकर, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, बाबा पार्टे, आर. के. पोवार, आदी उपस्थित होते.