राजर्षींच्या पुतळ्यासाठी युद्धपातळीवर हालचाली
By admin | Published: September 27, 2016 12:33 AM2016-09-27T00:33:24+5:302016-09-27T00:44:19+5:30
वीस लाखांचा खर्च : पूर्णाकृती पुतळा उभारणार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम तीनच महिन्यांत पूर्ण करायचे असल्याने याबाबतच्या हालचाली युद्धपातळीवर सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सभेत इमारतीच्या दर्शनी भागात अर्धपुतळा बसविण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, नंतर पदाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाच्या प्रांगणामध्ये महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्याच्या पूर्ततेसाठीही कंबर कसली आहे. याच्या नियोजनासाठी सोमवारी दुपारी बैठकही झाली.
जिल्हा परिषदेच्या २0 सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी शाहू महाराजांच्या करवीरनगरीत आपण काम करत असतानाही जिल्हा परिषदेच्या आवारात कुठेही त्यांचा पुतळा नसल्याची खंत व्यक्त करत या सभागृहाची मुदत संपण्याआधी हा पुतळा बसविण्याची घोषणा करत आपली देणगीही जाहीर केली होती.
यानंतर काही सदस्य आणि अधिकाऱ्यांनीही देणग्या जाहीर केल्या. मात्र, नंतर पदाधिकाऱ्यांच्या चर्चेत हा पुतळा जिल्हा परिषदेच्या इमारतीत दर्शनी भागात आणि तोही अर्धपुतळा बसविण्यापेक्षा तो ध्वजारोहणाच्या जागेसमोर पूर्णाकृती पुतळा उभारावा, यावर एकमत झाले. दरम्यान, सोमवारी दुपारी समिती सभागृहात पदाधिकारी, अधिकाऱ्यांची बैठक झाली. उपाध्यक्ष शशिकांत खोत, समाजकल्याण सभापती किरण कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्यासह खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत या पुतळ्यासाठीच्या वेगवेगळ्या खात्यांचे ना हरकत दाखले आवश्यक आहेत, याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यासाठी अनुकूलता दर्शवत पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली असल्याने अन्य विभागांचे दाखले गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. देखभाल आणि सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेचे हमीपत्रही आवश्यक आहे. या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एक स्वतंत्र कर्मचारी नेमण्याचे यावेळी ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)
खोत यांची एक लाख ११ हजारांची देणगी
या पुतळ्यासाठी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी सुरुवातीपासून पुढाकार घेतला आहे. त्यांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आपली देणगीही घोषित केली होती; परंतु नंतर पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय झाल्याने खोत यांनी त्यासाठी आपली देणगीची रक्कम वाढवून आता एक लाख ११ हजार रुपये जाहीर केली आहे.