संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर टाकण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:19 AM2021-01-15T04:19:53+5:302021-01-15T04:19:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया साेमवारपासून (दि. १८) सुरू करण्याचे आदेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया साेमवारपासून (दि. १८) सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र निवडणुका मार्च २०२१पर्यंत पुन्हा लांबणीवर टाकण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर बुधवारी दिवसभर हालचाली सुरू होत्या. महापालिकांच्या निवडणुका असल्याने दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना आताच निवडणुका नको असल्याचे समजते.
तब्बल वर्षभराच्या स्थगितीनंतर मंगळवारी निवडणूक प्राधिकरणाने संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली. वास्तविक बुधवारपासून सहकार विभागाच्या पातळीवर तयारी सुरू होणे अपेक्षित होणे गरजेचे होते. मतदार याद्यांची कटऑफ डेटसह इतर बाबींबाबत कोणत्याही प्रकारची मार्गदर्शक सूचना आल्या नसल्याने सहकार विभागाच्या पातळीवर संमभ्रवस्था आहे.
नवी मुंबई, कोल्हापूरसह इतर महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या घाईत शिखर संस्थांच्या निवडणुका नको, असा दोन्ही कॉंग्रेसमध्ये एक मतप्रवाह आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच प्रस्ताव पडून आहे. सर्वच निवडणुका मार्च २०२१पर्यंत पुन्हा लांबणीवर टाकाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी दिवसभर याबाबत सत्तारूढ गटात खलबते सुरू होती.
कायदा काय सांगतो...
सहकार कायद्यानुसार एखाद्या संचालक मंडळास जास्तीत जास्त एक वर्ष मुदतवाढ देता येते. आता मुदतवाढीची मर्यादा संपली आहे. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ द्यायची म्हटले तर नवीन वटहुकूम काढावा लागेल, राज्य सरकार तो काढेलही मात्र त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी गरजेची आहे.