आजरा कारखान्याचे कर्ज भरण्यासाठी हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:28 AM2021-05-25T04:28:48+5:302021-05-25T04:28:48+5:30

कोल्हापूर : आजरा साखर कारखाना सुरू करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ६८ कोटी ...

Movements to repay the debt of the Ajra factory | आजरा कारखान्याचे कर्ज भरण्यासाठी हालचाली

आजरा कारखान्याचे कर्ज भरण्यासाठी हालचाली

Next

कोल्हापूर : आजरा साखर कारखाना सुरू करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ६८ कोटी रुपये भरण्याची गरज असून, त्यासाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. सोमवारी सर्व संचालकांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली असून, यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. हा कारखाना कसा सुरू करता येईल याबद्दल सोमवारपासूनच ‘लोकमत’मध्ये वृत्तमालिका सुरू झाली आहे.

दोन गळीत हंगाम न झालेला आजरा साखर कारखाना खासगी कंपनीने किंवा अन्य कारखान्याने चालविण्यासाठी घ्यावा यासाठी जिल्हा बँकेने नोटीस दिली आहे. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने आणखी आठ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. परंतु याच दरम्यानच्या काळात कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच संचालकांनी शासकीय विश्रामगृहावर मुश्रीफ आणि त्याआधी अजिंक्यतारा येथे सतेज पाटील यांची भेट घेतली. आमदार राजेश पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते.

जिल्हा बँकेचे कर्ज भरल्याशिवाय प्रश्न सुटणार नसल्याने पहिल्यांदा हे कर्ज कसे भरायचे यावर चर्चा झाली. यासाठी मुश्रीफ यांच्यासह सतेज पाटील यांनी निर्णायक भूमिका घ्यावी, अशी भूमिका संचालकांनी मांडली. यासाठी दोन्ही मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

अध्यक्ष शिंत्रे यांच्या संस्था, अशोक चराटी यांची आजरा अर्बन बँक, मुकुंद देसाई चेअरमन असलेली जनता बँक, जनार्दन टोपले अध्यक्ष असलेली स्वामी विवेकानंद पतसंस्था यांनीही याकामी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली. पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेचे कर्ज भरायचे आणि त्यानंतर तातडीने बँकेने पुन्हा कर्ज मंजूर करायचे, असा फॉर्म्युला यावेळी ठरविण्यात आला. या सर्व प्रक्रियेमध्ये आपण काय करू शकतो हे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. सतेज पाटील यांनीही ठोस काय करणार हे दोनच दिवसांत सांगतो, असे सर्वांना आश्वस्त केले आहे.

बैठकीला कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदा कुलकर्णी, संचालक विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, अशोक चराटी, सुधीर देसाई, दिंगबर देसाई, जितेंद्र टोपले, अंजना रेडेकर, अनिल फडके, दशरथ अमृते, तानाजी देसाई, एम. के. देसाई, काशिनाथ तेली, प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण, अकौंटंट रमेश वांगणेकर उपस्थित होते.

चौकट

महाविकास आघाडीत भाजप कसा

ही चर्चा सुरू असतानाच जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे शासकीय विश्रामगृहावर आले. यावेळी मुश्रीफ यांनी आजरा कारखान्याचे महाविकास आघाडीचे संचालक आले आहेत असे सांगून संचालकांची पाटील यांच्याशी ओळख करून दिली. शिंत्रे शिवसेनेचे, धुरे राष्ट्रवादीचे, अशोक चराटी, टोपले भाजपचे.... हे ऐकताच महाविकास आघाडी म्हणता आणि भाजप कसा अशी विचारणा हसत हसतच पाटील यांनी केली. तेव्हा कारखान्याचे सर्वपक्षीय संचालक भेटायला आल्याचे सांगण्यात आले.

चौकट

विनय कोरेंचीही भेट

या सर्व संचालकांनी शनिवारी जनसुराज्यचे अध्यक्ष विनय कोरे यांचीही भेट घेतली. कोरोना काळात सहकारी संस्थांसाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या योजनेचा आजरा कारखान्यासाठी काही लाभ हाेईल का यावर कोरे यांनी यावेळी चर्चा केली. मात्र, या संदर्भातील अटी किचकट असल्याने हा विषय मागे पडल्याचे सांगण्यात आले.

२४०५२०२१ कोल आजरा शुगर ०१

आजरा कारखान्याच्या संचालकांनी सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी शासकीय विश्रामगृहावर चर्चा केली. यावेळी डावीकडून अध्यक्ष सुनील शिंत्रे, मुकुंद देसाई, जितेंद्र टोपले, सुधीर देसाई, आमदार राजेश पाटील उपस्थित होते. (छाया - समीर देशपांडे)

Web Title: Movements to repay the debt of the Ajra factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.