कोल्हापूर: ‘मेन राजाराम’ हलविण्याच्या हालचालींना वेग, पालकमंत्र्यांच्या मनांतील डाव कळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 07:19 PM2022-11-07T19:19:37+5:302022-11-07T19:20:03+5:30
पालकमंत्री केसरकर यांनी गेल्या आठवड्यात ‘मेन राजाराम’ प्रशालेची पाहणी केली. किती विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना कोणत्या सोयी, सुविधा आहेत, या सुविधा देताना जुनी हेरिटेज इमारत म्हणून काही अडचणी येतात का याचीही त्यांनी माहिती घेतली.
कोल्हापूर :‘मेन राजाराम’ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय बंद होणार नसले तरी ते हलविण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. एकीकडे महापालिकेच्या नऊ शाळांची पाहणी केल्यानंतर आता शहरात माध्यमिक शाळांसाठी आरक्षित असलेल्या जागांचाही शोध सुरू आहे. याची वाच्यता न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मनात नेमका काय डाव आहे अशी विचारणा होत आहे.
केसरकर यांनी गेल्या आठवड्यात ‘मेन राजाराम’ प्रशालेची पाहणी केली. किती विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना कोणत्या सोयी, सुविधा आहेत, या सुविधा देताना जुनी हेरिटेज इमारत म्हणून काही अडचणी येतात का याचीही त्यांनी माहिती घेतली. यानंतर त्यांच्या या पाहणीच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित केल्यानंतर त्यांनी याबाबत गुरुवारी पत्रकार परिषदेत खुलासाही केला.
परंतु या खुलाशामध्येच केसरकर यांनी ‘मेन राजाराम’साठी पर्यायी जागा शोध असल्याचे सांगून ही प्रशाला येथून हलवून त्या ठिकाणी अन्य पर्यायी प्रकल्प उभारला जाण्याची शक्यता व्यक्त केली. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या नऊ शाळांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. यातील तीन शाळा सुधारण्यापलीकडे असून, काही शाळांना पुरेसे मैदान नाही. म्हणून आता शहरातील माध्यमिक शाळांसाठीच्या आरक्षणाच्या जागा पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या जागांचीही पाहणी करण्यात आली असून, या सर्व प्रकरणी पर्यायी जागांचा अहवाल उद्या, सोमवारी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांना सादर केला जाण्याची शक्यता आहे.
या आरक्षित जागांची पाहणी
माध्यमिक शाळेसाठी आरक्षित अशी पाऊण एकराची जागा रंकाळ्यामागे आहे. राधानगरी रोडवर चिव्याचा बाजार या ठिकाणी आठ एकरांहून अधिक जागा आरक्षित आहे. उत्तरेश्वर पेठ येथेही जागा असून, तेथे मात्र पुराच्या काळात पाणी येते. या तीन जागांची पाहणी करण्यात आल्याचे समजते.
प्रकरण गंभीर वळण घेण्याची शक्यता
‘मेन राजाराम’चे भवानी मंडपातून स्थलांतर माजी विद्यार्थ्यांसह अनेक संघटनांना मान्य नसून यातील काही संघटनांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. माजी विद्यार्थीही याला विरोध करण्यासाठी एकत्र येणार असून, हे प्रकरण गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे.