चित्रपट महामंडळाची सभा गुंडाळली, अभूतपूर्व गोंधळ : समांतर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:00 AM2019-12-16T11:00:38+5:302019-12-16T11:08:12+5:30

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा एकमेकांवर धावून जाणे, निकाल भिरकावणे, दमदाटी, दडपशाही, घेराव, प्रचंड वादावादीच्या वातावरणात आणि एकाही विकासकामाच्या मुद्द्यांवर चर्चा न होता ‘सर्व विषय मंजूर’ म्हणत रविवारी गुंडाळण्यात आली.

Movie board meeting wrapped up, unprecedented confusion: parallel meetings | चित्रपट महामंडळाची सभा गुंडाळली, अभूतपूर्व गोंधळ : समांतर सभा

कोल्हापुरातील शाहू सांस्कृतिक भवनात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या सुरुवातीलाच सभासदांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्यांचे सभासदत्व रद्दची मागणी केली. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देचित्रपट महामंडळाची सभा गुंडाळलीअभूतपूर्व गोंधळ : समांतर सभा

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा एकमेकांवर धावून जाणे, निकाल भिरकावणे, दमदाटी, दडपशाही, घेराव, प्रचंड वादावादीच्या वातावरणात आणि एकाही विकासकामाच्या मुद्द्यांवर चर्चा न होता ‘सर्व विषय मंजूर’ म्हणत रविवारी गुंडाळण्यात आली.

माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेल्याचे सभासदत्व आणि बेकायदेशीर व अपूर्ण अहवाल रद्द करा, या मागणीवरून सभेत ‘न भूतो, न भविष्यती’ असा गोंधळ झाला. यावेळी विरोधी गटाने अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या राजीनाम्याची मागणी केली व समांतर सभा घेतली.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सभा मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक भवनमध्ये झाली. यावेळी उपाध्यक्ष धनाजी यमकर, कार्यवाह सुशांत शेलार, खजिनदार संजय ठुबे, संचालक वर्षा उसगावकर, सतीश बीडकर, सतीश रणदिवे, पितांबर कांबळे, विजय खोचीकर, शरद चव्हाण, मधुकर देशपांडे, निकिता मोघे उपस्थित होत्या.

पावणेबारा वाजता राष्ट्रगीताने सभेला सुरुवात झाली. अध्यक्षांचे प्रास्ताविक सुरू असतानाच मिलिंद अष्टेकर यांनी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या अभिनेत्री छाया सांगावकर, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर यांच्या ‘सभासदत्व रद्द’ची मागणी केली. ती सभासदांनी लावून धरल्याने गोंधळास सुरुवात झाली. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सुरुवातीलाच ‘अशा पद्धतीने वागणार असाल तर सभा घेणार नाही,’ असे सुनावले.

कार्यवाह सुशांत शेलार यांनी ‘सभेच्या प्रक्रियेनुसार जाऊ या; अध्यक्षांना प्रास्ताविक करू द्या,’ असे आवाहन केले. अखेर अर्ध्या तासाने अध्यक्षांनी प्रास्ताविक सुरू केले. मात्र प्रास्ताविक संपल्यानंतर लगेच त्यांनी लंच टाइम जाहीर केला आणि ते व्यासपीठावरून खाली आले. हे पाहताच संतप्त सभासदांनी अध्यक्षांना घेराव घातला व त्यांना पुन्हा व्यासपीठावर यायला भाग पाडले.

त्यानंतर अध्यक्षांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून महामंडळाचे वकील सविस्तर बोलतील, असे सांगितले. अ‍ॅड. प्रशांत पाटील यांनी सभासदत्व रद्दचे प्रकरण न्यायालयात असून त्यावर निर्णय घेता येणार नाही, असे सांगितले. यावर संचालक बाळा जाधव यांनी मागच्या सर्वसाधारण सभेत सभासदत्व रद्दचा निर्णय झाला होता. पुन्हा सभासद व्हायचे असेल तर न्यायालय किंवा सभेत ठराव करावा लागतो, असे सांगण्यात आले होते.

महामंडळाला याबाबत निर्णय घेता येत नसेल तर कोणत्या अधिकारात पुन्हा सभासदत्व दिले, अशी विचारणा केली. या विषयावरून पुन्हा प्रकरण पेटले. या गोंधळातच सुशांत शेलार यांनी अहवाल वाचन सुरू केल्याने सभासदांनी थेट व्यासपीठावर येऊन माईक बंद पाडला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला. अध्यक्ष दादच देत नाहीत म्हटल्यावर विजय पाटकर यांनी अध्यक्षांच्या राजीनाम्याची व वर्षा उसगावकर यांना अध्यक्षपद देण्याची मागणी केली. ती सगळ्यांनी उचलून धरली. अखेर जेवणासाठी सभा थांबवण्यात आली.

दोन वाजून २२ मिनिटांनी पुन्हा सभा सुरू झाली. यावेळी शेलार यांनी सर्व सभासदांना हे प्रकरण कळावे यासाठी अष्टेकर व सांगावकर या दोघांनाही बोलण्यासाठी १०-१० मिनिटांचा वेळ द्यावा, असा प्रस्ताव मांडला. याला सभासदांनी जोरदार विरोध केला.

‘गेली सहा वर्षे हे प्रकरण सुरू आहे. आता पुन्हा सगळ्यांसमोर मांडा म्हणताय, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. एका व्यक्तीसाठी सगळ्या सभासदांशी तुम्ही का भांडताय?’ अशी विचारणा करण्यात आली. त्यावर शेलार यांनी ‘हात उंचावून सभासदत्वावर मत घेऊ या,’ असे सांगितले. यालाही सभासदांनी विरोध केला.

‘न्यायालयाने अष्टेकर यांना निर्दोष मुक्त केले आहे. इथे न्यायालय मांडणारे तुम्ही कोण?’ असे म्हणत जाधव यांनी शेलार यांच्या अंगावर निकाल फेकला. हा गोंधळ सुरू असतानाच शेलार यांनी इतिवृत्त वाचायला सुरुवात केली. ‘सगळे विषय मंजूर’ म्हणत सभा पावणेतीन वाजता गुंडाळत राष्ट्रगीत सुरू करण्यात आले.

आम्हालाही बोलू द्या

या सभेला मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद असे महाराष्ट्रातून सभासद आले होते. मात्र एकाच विषयावरून सभा पुढे सरकत नाहीय म्हटल्यावर या सभासदांनी आम्हालाही बोलू द्या, आमचे विषय मांडू द्या, चित्रपटसृष्टीचे, आमचे प्रश्न कोणी विचारात घेणार की नाही? अशी मागणी केली.

तुमच्याकडूनच शिकलोय..

यावेळी मेघराज राजेभोसले गोंधळावरून सभासदांना सुनावत असताना विजय पाटकर यांनी ‘आम्ही तुमच्याकडूनच हे सगळं शिकलोय,’ अशी कोपरखळी मारली. एवढ्या तणावातही यावरून सभागृहात हशा पिकला.

पोलीस बंदोबस्त, कारवाईची मागणी

सभेला गोंधळ होणार हे लक्षात घेऊन महामंडळाकडून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामुळे तीसहून अधिक पोलीस सभेला उपस्थित होते. सभेच्या शेवटी सुशांत शेलार हे राष्ट्रगीत म्हणताना त्यांच्याकडून चूक झाली. यावर हेमसुवर्णा मिरजकर यांनी ‘ज्यांना राष्ट्रगीत व्यवस्थित म्हणता येत नाही, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी,’ अशी मागणी केली.
 


अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभेत संचालक रणजित जाधव यांनी शिवीगाळ करून हातातील माईक हिसकावून घेत, ‘मी कोल्हापूरचा आहे. तुम्हाला बघून घेईन,’ अशी धमकी दिली. त्यामुळे माझ्या जीविताला धोका आहे, अशी तक्रार चित्रपट महामंडळाचे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांनी रणजित जाधव यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री दिली.
 


मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रश्नांची सोडवणूक, नवे उपक्रम घेऊन महामंडळाची घडी बसावी, या अपेक्षेने मी या सभेकडे बघत होतो. अनेक विषय मंजूर करून घ्यायचे होते; मात्र मोजक्या लोकांमुळे कोल्हापूरच्या प्रतिमेला तडा गेला आहे. सभासदत्व रद्दचा विषय न्यायालयीन होता. कोल्हापूरच्या जुन्या कार्यालयाची जागा विकण्याचा ठराव संचालकांच्या बैठकीत झाला आहे. तसेच सभा कायदेशीर असून, विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाल्याने ही जागा विकून मुंबईच्या कार्यालयासाठी जागा घेण्यात येणार आहे.
मेघराज राजेभोसले,
अध्यक्ष. अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ
 

Web Title: Movie board meeting wrapped up, unprecedented confusion: parallel meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.